इगतपुरी ( नाशिक ) : मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल पॉलीफिल्मस कंपनीच्या परिसरात मंगळवार (दि.20) रोजी काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आग लागल्याचे समजते. थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगरपरिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक येथून अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागण्याचे कारण अस्पष्ट असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत.