नाशिक

Nashik Onion Price Protest | मुख्यमंत्र्यांशी चर्चेच्या अटीवर शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित

कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केली मध्यस्थी

पुढारी वृत्तसेवा

कळवण : कळवण येथे मका व कांद्याला हमीभाव तसेच मका खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण अखेर तीन दिवसांनी आमदार नितीन पवार यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. सकारात्मक चर्चेनंतर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणून शेतकऱ्यांच्या मागण्या राज्यस्तरावर मांडल्या जातील, असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

तीन दिवसांपासून बाजारभाव घसरल्यामुळे मका व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मका खरेदी केंद्र तात्काळ २,४०० रुपये हमीभावाने सुरू करावे, शेतकऱ्यांची नवीन नोंदणी करून खरेदी करावी, कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित ३००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा, कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी गुरुवारपासून (दि. २६) कळवण बाजार समितीच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.

आमदार नितीन पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांना येथे बोलवा तरच आंदोलन स्थगित करू, अशी मागणी केल्याने आमदार नितीन पवार यांनी मंत्री दादा भुसे व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करत प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला. दोघांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आमदार पवार यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन शेतकऱ्यांनी उपोषण तूर्त स्थगित केले.

या आंदोलनात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, काशीनाथ गुंजाळ, शशी हिरे, संदीप शिंदे, रामकृष्ण जाधव, मुन्ना पगार, गोरख देवरे, मनोज रौंदळ यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, घनश्याम पवार, जितेंद्र वाघ, संदीप वाघ, साहेबराव जाधव उपस्थित होते. शासनाने लवकर ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT