नाशिक

Nashik unseasonal rain | जिल्ह्यात सहा तालुक्यांत गारपिटीसह अवकाळीचा तडाखा

चांदवड, लासलगाव, कळवण, सिन्नर, देवळ्याला सर्वाधिक फटका : द्राक्ष, उन्हाळी कांदा, गहू, डाळिंबाचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्याला सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा देताना अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने द्राक्ष, कांदा, गहू आणि टोमॅटो पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. अनेक गावांमध्ये बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

काही ठिकाणी हरभऱ्याच्या आकाराची गारपीटही झाली आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याला बळीराजा चिंतेत सापडला आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला असून, या दरम्यान लग्नाची असणाऱ्यांचीही धाकधूक वाढली आहे.

चांदवड पट्ट्यात दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले होते. त्यानंतर वडनेर भैरव, बहादुरी, दुधखेड नवापूर, पारेगाव, चिखलआंबे आदी गावांसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम द्राक्ष, कांदा आणि गहू पिकांवर होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या या भागात सुमारे २५ ते ३० टक्के द्राक्षबागांचे लिलाव सुरू असताना, या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. वडनेर भैरवला शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडाली.

आधीच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे द्राक्षांना अपेक्षित मागणी नसल्याने कमी दरात विक्री करावी लागत आहे, त्यातच या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. दुसरीकडे कांदा पिकालाही समाधानकारक बाजारभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. कळवण शहरासह तालुक्यातील काही भागांत अवकाळीचा तडाखा बसला. दिवसभर तीव्र उकाडा जाणवत असताना सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन आकाश ढगाळ झाले. त्यानंतर वाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी कोसळल्या. तालुक्यातील अनेक भागांत शेतकरी पावसाची धास्ती लागल्याचे दिसून आले. या अवकाळी पावसामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या कांदा व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.

खानगाव-कोटमगावला गारपिटीने द्राक्षबागांचे नुकसान

निफाड तालुक्यातील खानगाव, कोटमगाव तसेच लासलगाव रोड परिसरात बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक गारपिटीचा तडाखा बसला. जोरदार पाऊस व गारांच्या मारामुळे द्राक्षबागांसह गहू, कांदा, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खानगाव येथील शेतकरी गोरख भाऊसाहेब भिलारे यांच्या चार एकर द्राक्षबागेला गारपिटीचा मोठा फटका बसला. गारांचा वेग अत्यंत तीव्र असल्याने द्राक्षबागांची पाने झडून पडली असून, अनेक ठिकाणी वेल जमिनीवर कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. लासलगाव परिसरात कांदा पिकात पाणी साचल्याने नुकसान होण्याची भीती असून, पावसाचा जोर आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी गव्हाचे पिके अक्षरश: आडवे झाले.

देवळ्यात वादळी पाऊस

देवळा शहर व तालुक्यात सायंकाळी ६ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळीचा दणका बसला. पश्चिम भागातील खर्डे मुलूकवाडी परिसरात गारा पडल्याने उन्हाळ कांद्यासह, डाळिंबबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या परिसरात कांदा काढणी व गहू-हरभरा काढणी सुरू आहे. आंबा, पपई व डाळिंबबागांचे नुकसान झाले.

सिन्नरलाही जोरदार पाऊस

सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी विशेषतः संगमनेरतालुक्याच्या पट्ट्यात सायंकाळी गारपिटीसह दोन ते तीन जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा आणि द्राक्ष, डाळिंब शेतीचे प्रचंड नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे या तालुक्यात गहू पीक आडवे झाले. शेतात गारांचे ढीग साचले होते. अनेक ठिकाणी गहू आणि उन्हाळी कांदा काढण्याचे काम सुरू होते. सिन्नर पट्ट्यात जोणारे, कोनांबे, दोडी, दापूर, मुसळगाव, बारगाव पिंप्री, शिंदे पळसे येथे जोरदार पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT