कळवण : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड झालेले कोबी पीक. Pudhari News Network
नाशिक

Nashik Farmer News : कांदा, टोमॅटोने रडविले; शेतकऱ्यांची कोबीला पसंती

कळवण तालुक्यात यंदा अंदाजे 400 ते 500 एकरवर लागवड

पुढारी वृत्तसेवा

कळवण (नाशिक) : उमेश सोनवणे

कांदा, मिरची आणि टोमॅटोने यावर्षी शेतकऱ्यांना तोट्यात घातले. कधी अवकाळी, कधी गारपीट तर सध्या संततधारेमुळे निसर्गाचा जुगार बनलेल्या शेतीत दोन हात करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कोबी पिकाचा पर्याय निवडून शेतीला सुरुवात केली आहे. आजमितीस शाश्वत नफा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी कोबीला पसंती दिल्याने कोबीचे पीक जोमदार आल्याचे दिसते. तालुक्यात यावर्षी ४०० ते ५०० एकर क्षेत्रावर कोबीची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षापेक्षा हे प्रमाण ४० ते ६० एकराने वाढले आहे. गतवर्षी सुरुवातीला कोबीला १५ ते २३ रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे झाले होते.

यंदा अतिपावसामुळे कांदा लागवड उशिरा झाली. उशिरा लागवड झाल्याने पीक पाहिजे तसे आले नाही. आलेले पीक मे महिन्यातील ऊन आणि अवकाळी पावसाने धुतले. यामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मिरचीनेही पाऊस आणि कमी बाजारभावाने रडवले. यानंतर टोमॅटो पिकाचे दोन पैसे होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सततच्या पावसाने त्यावरही पाणी फेरले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा कोबीकडे वळवला आहे. गुजरात, मुंबई, मालेगाव, जळगाव, नाशिकमध्ये मार्केट आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणचे बहुतांश व्यापारी थेट बांधावर माल घेण्यासाठी येत असल्याने शेतकऱ्यांना हे पीक काढणे आणि विकण्यासाठीचा त्रास खूप कमी आहे.

एकरी एक लाख खर्च

साधारण ४५ ते ६० दिवसांचे पीक असलेल्या कोबीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ७० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एका एकरमध्ये २० टन कोबीचे उत्पादन मिळते. बाजारभाव १५ ते २५ रुपयांदरम्यान मिळाला तर एकरी तीन ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामुळे या पिकाला शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणन गणले जाऊ लागले आहे.

इतर पिकांच्या तुलनेत कोबी पिकामुळे शेतकऱ्यांना तोटा होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. कमी दिवसात हे पीक येत असले तरी खूप मेहनत घेण्याचे आणि पोटाच्या मुलांप्रमाणे जपावे लागते. सध्याच्या घडीला इतर पिकांनी निराशा केल्यामुळे कोबी पिकाकडून अपेक्षा आहेत. यामुळे तालुक्यात कोबी लागवड मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
भगवान पाटील, दह्याणे ( बर्डे) कोबी उत्पादक
कळवण तालुक्यात व आसपास भागात अंदाजे ८०० ते १००० किलो कोबी बियाण्यांची विक्री झाली असून, त्यात काही शेतकऱ्यांनी नर्सरीमधून तयार रोप घेतली आहेत. यावर्षी युरो २, वीर ३३३ डॉलर या कोबींच्या वाणबरोबरच इतर वाणांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी होती.
सुधाकर खैरनार, संचालक, सप्तशृंगी ॲग्रो कळवण
सतत पडणाऱ्या पावसामुळे कोबी पिकावर मुख्यतः करपा, केवडा, मूळकुज, ब्लॅक रॉट या प्रकारचे बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी फवारणी करून काळजी घ्यावी.
सीताराम पाखरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, कळवण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT