नाशिक: बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीचा ताबा नाशिक ग्रामीण पोलिसांनी घेतला. उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे १५ डिसेंबरला ग्रामीण पोलिसांना ताबा घेता आला नाही. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून आज सकाळी नितीन उपासनी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. त्यानंतर पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेची दत्ता शिंदे हे करणार आहे.
या घोटाळ्यात नाशिक विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हेही मुख्य संशयित असल्याचे समोर आले असून लवकरच त्यांनाही अटक होणार आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्याचा आरोप उपासनींवर असुन सध्या तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. उपासनीने जामिनासाठी न्यायालयात अर्जही केला आहे.
शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी अमळनेर येथून चौघांना अटक करीत शालार्थ आयडी घोटाळ्याचा छडा लावला होता. या तपासादरम्यान नाशिकरोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अशोक गिरी यांनी संशयित शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत करून पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गिरी यांना निलंबित केले आहे.
दरम्यान, ग्रामीणने मालेगावातील काही संस्थांमधील शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून हजारहून अधिक शालार्थ आयडी तयार व विक्री करण्याच्या प्रकरणात उपासनीची काही महिन्यांपूर्वीच चौकशी केली होती. मात्र, राजकीय प्रभाव टाकून त्याने अटक रोखली होती. शहर पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर आता ग्रामीणनेही त्याचा ताबा घेतला आहे.