नाशिकमध्ये बनावट नोटांप्रकरणी तिघांना अटक File Photo
नाशिक

Nashik fake Notes|नाशिकमध्ये बनावट नोटांप्रकरणी तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दहा हजार रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्या साथीदारास शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्रभाकर पुजारी (रा. नाशिक रोड) असे संशयिताचे नाव आहे. त्याने बनावट नोटा स्वाती आहिरे आणि पूजा कहाने यांना दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मे महिन्यात मुक्तिधाम परिसरातून गुंडाविरोधी पथकाने स्वाती आणि पूजा यांच्याकडून दहा हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. प्राथमिक तपासात या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. मात्र इतर ठोस माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तपास थंडावला होता. त्यामुळे गुंडाविरोधी पथकाने संशयित महिलांची पुन्हा चौकशी केल्यानंतर त्यांनी बनावट नोटा देणाऱ्याची माहिती दिली. त्यानुसार संशयित प्रभाकर पुजारीला अटक केली आहे. संशयित पुजारी याचा कोणताही रेकॉर्ड नसल्याचे पाेलिसांना आढळून आले. मात्र त्याने या नोटा कोठून आणल्या, या आधी किती नोटा चलनात आणल्या याची माहिती घेण्यासाठी पथकाने संशयित पुजारीसह स्वाती व पूजा यांनाही अटक केली आहे. संशयितांनी बनावट नोटांची छपाई केली नसल्याचे समोर आले असले तरी त्यांना या नोटा पुरवल्या कोणी याची माहिती शोधण्यासाठी पोलिसांनी तिघांचीही पोलिस कोठडी घेतली आहे.

बनावट नोटांचे प्रकरण

संशयित पूजा हिच्याकडे स्वाती आहिरेने काही दिवसांपूर्वी ५०० रुपयांच्या २० नोटा दिल्या हाेत्या. मात्र या नोटा बनावट असल्याचे समजल्याने पूजा हिने स्वातीला बोलावून नोटा परत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दोघी मुक्तिधाम परिसरात भेटणार होत्या. मात्र गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून दोघींना पकडले. नोटांवरील महात्मा गांधी यांचा वॉटर मार्क खऱ्या नोटांसारखा नव्हता, तसेच सिक्युरिटी थ्रेटही आढळून आले नाही. त्या जागी हिरवी पट्टी लावल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे नोटा जप्त करून दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT