नाशिक : शासकीय नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्र, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने तयार केलेले खोटे व्हॉट्सअॅप चॅट आणि डिजिटल स्वाक्षऱ्यांचा वापर करत एका ३५ वर्षीय खासगी अभियंत्याची १९ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात श्रीकांत नानासाहेब वानखेडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पंचवटीतील अमृतधाम परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराची डिसेंबर २०२४ मध्ये नाशिक - चांदवड प्रवासादरम्यान संशयिताशी ओळख झाली. स्वतःला सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असल्याचे सांगत त्याने नाशिक जिल्हा परिषदेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, FAKE APPOINTMENT LETTER तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या कथित संवादाचे खोटे स्क्रीनशॉट पाठवले.
यानंतर मेडिकल टेस्ट, फिटनेस प्रमाणपत्र, मंत्रालयीन मंजुरी व कागदपत्र पडताळणी अशा विविध कारणांखाली १६ डिसेंबर २०२४ ते २९ मे २०२६ या कालावधीत ऑनलाइन व्यवहारातून १९.४३ लाख रुपये उकळण्यात आले. दीड वर्ष उलटूनही नियुक्ती न झाल्याने संशय आल्यावर अभियंत्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या फसवणुकीमागील रॅकेटचा तपास करत आहेत.