भाजप संघटन पर्व अभियानानिमित्त नाशिकमधील लंडन पॅलेस येथे बाेलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. Pudhari News Network
नाशिक

Nashik | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीद्वारे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जाणार असून, अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा विचार करून मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतील, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. आभार दौऱ्यानिमित्त उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील जाहीर सभेत शुक्रवारी (दि.14) दिलेला इशारा भाजपसाठी नसल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.

भाजप संघटन पर्व अभियानानिमित्त नाशिकमधील लंडन पॅलेस येथे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन, विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले की, भाजपचे संघटन पर्व अभियान सुरू आहे. या अभिनांतर्गत १.५१ कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. अकोला, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक याठिकाणी विभागीय स्तरावरील बैठका पडल्या आहेत. कोल्हापूर, ठाणे, मुंबई ठिकाणी सोमवार (दि. १७)पासून बैठका होणार आहेत. गेल्या ४० दिवसात १.१४ लाख सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील हे पहिले पर्व असेल. या माध्यमातून ३ लाख कार्यकर्त्यांना सक्रीय सदस्यपद दिले जात आहे. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंडल अध्यक्ष, शहर-जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले. लाडकी बहिण योजना बंद होणार, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. मात्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो, फडणवीस सरकार कुठल्याही योजना बंद करणार नाही, याउलट काही नवीन योजना लागू केल्या जातील, असा दावाही त्यांनी केला.

पालकमंत्रीपदावर लवकरच निर्णय

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातला आहे. गेल्या सिंहस्थात गिरीश महाजन यांनी पालकमंत्रीपदाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली होती. त्यांचा अनुभव लक्षात घेता ते पुन्हा पालकमंत्री व्हावेत, अशी भाजपची मागणी आहे. दादा भुसे यांनाही पालकमंत्रीपदाचा अनुभव आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत महायुतीत कुठलाही वाद नाही. महायुतीचे नेते येत्या १०-१२ दिवसात यावर एकत्र बसून निर्णय घेतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

गद्दारांना पुन्हा उमेदवारी नाही

लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधात काम करणाऱ्यांना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जाणार नाही. या प्रकरणात आपण स्वत: जातीने लक्ष घालणार आहोत, असे बावनकुळे म्हणाले. ज्या ठिकाणी आम्ही कमजोर आहोत, त्याच ठिकाणी आमच्याकडे नवीन प्रवेश दिले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. 'लव जिहाद' रोखण्यासाठी सर्वात प्रभावी कायदा महाराष्ट्रात होईल, त्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

धस-मुंडेंमध्ये कॉम्प्रमाईज नाही

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मतभेदांवर चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत. लपून-छपून कोणतीही चर्चा झाली नाही. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. माझ्यासमोर कुठलीही काॅम्प्रमाईजची भूमिका घेतली नाही. दोघांनी योग्य भूमिका मांडली आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT