नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक संशयित उद्धव निमसे यांना तुरुंगातूनच महापालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी (दि. २६) परवानगी दिली. त्यांच्या जामिनावरील सुनावणी २९ डिसेंबरपर्यंत लांबली आहे. त्यामुळे निमसे व त्यांचे समर्थक आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निमसे यांच्या जामिनास धाेत्रे गटासह वकिलाने कडाडून विराेध केला आहे.
राहुल संजय धोत्रे यांच्या खूनप्रकरणी कारागृहात असलेले उद्धव निमसे जामिनासाठीही प्रयत्नशील आहेत. त्यांनी ७ नोव्हेंबरला जामीन अर्ज दाखल केला होता. १४ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी सुरू आहे. मंगळवारी (दि. २३) अर्जावर युक्तिवाद झाला असता धोत्रे गटातर्फे थेट न्यायाधीशांवर आक्षेप नोंदवण्यात आला.
हे प्रकरण प्रधान मुख्य न्यायाधीशांपर्यंत गेल्यानंतर बुधवारी (दि. २४) पुन्हा सुनावणी झाली. संबंधित न्यायालयाने पुढील निर्णयासाठी प्रधान मुख्य न्यायाधीशांकडे विनंती केली. त्यानुसार, निमसे यांना कारागृहातून महापालिका निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी, या मुद्द्यावर शुक्रवारी (दि. २६) सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायाधिशांनी निमसे यांना कारागृहातूनच निवडणूक लढवण्यास परवानगी 'ग्रान्ट' केल्याचे ॲड. मनाेज पिंगळे यांनी सांगितले.
भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटीलही लटकले
गाेळीबारासह खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या जामीन अर्जावरही शुक्रवारी (दि. २६) निर्णय हाेणार हाेता. मात्र, न्यायालयाने या अर्जावर २९ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे जगदीश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.