नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निवडणूक प्रक्रियेदरम्यान बेकायदेशीर पैशाच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून वतीने शहरातील प्रमुख महामार्गांवर व प्रवेशद्वारांवर 'स्थिर भरारी' पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
निवडणूक काळात पैशांचा गैरवापर व मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक शहरात प्रवेश करणारे तसेच शहराला जोडणारे महत्त्वाचे महामार्ग आणि मार्गांवर या पथकाची तैनाती करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.
आडगाव, पेठ नाका, म्हसरुळ, सातपूर, गंगापूर रोड, मुंबई-नाशिक (माघार) मार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग तसेच दिंडोरी रोड या ठिकाणी वाहनांना थांबवून तपासणी करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावरून मुंबईकडून नाशिककडे येतानासुद्धा भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
संशयास्पद तपासणीदरम्यान वाहने, रोख रक्कम, कागदपत्रे तसेच इतर साहित्याची सखोल चौकशी केली जात आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी 'स्थिर भरारी' पथकाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, पारदर्शक व निर्भय निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे, तसेच नागरिकांचा निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणे हा या पथकाच्या नियुक्तीमागील मुख्य उद्देश आहे. तपासणीदरम्यान नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत शहरात शांतता, शिस्त व कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी 'स्थिर भरारी' पथक महत्वाची भूमिका बजावत आहे.