नाशिक : आसिफ सय्यद
नाशिक महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. या ऐतिहासिक कामगिरीच्या केंद्रस्थानी होते कुंभमेळामंत्री गिरीश महाजन. २०१७ नंतर २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपला नाशिकमध्ये सत्तास्थापनेचा जादुई आकडा पार करून देत महाजन यांनी स्वतःला भाजपसाठी खऱ्या अर्थाने 'संकटमोचक' म्हणून सिद्ध केले.
१२२ पैकी तब्बल ७२ जागांवर विजय मिळवत भाजपने नाशिक हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा ठसठशीतपणे दाखवून दिले. ही निवडणूक सोपी नव्हती. उलट ती आव्हानांची चक्रव्यूह होती. भाजपमध्ये उमेदवारीसाठी तब्बल १,०६७ इच्छुक रिंगणात होते. १२२ जागांसाठी इतकी प्रचंड स्पर्धा म्हणजे बंडखोरी, नाराजी आणि अंतर्गत संघर्षाची शक्यता अटळच. मात्र, याच टप्प्यावर गिरीश महाजन यांनी निवडणूक प्रभारी म्हणून सूत्रे हाती घेतली आणि संपूर्ण रणनीतीला स्पष्ट दिशा दिली.
महायुतीचे सरकार केंद्र व राज्यात असतानाही स्थानिक पातळीवर युती न करता भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धाडसी होता. पण, महाजन यांनी तो ठामपणे राबवला, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती न करता, भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांनाच संधी देण्याचा निर्णय म्हणजे कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला दिलेले बळ होते. परिणामी, पक्षात काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली.
दीर्घकालीन राजकीय फायद्याचा पाया याच निर्णयातून घातला गेला. '१०० प्लस'चा नारा केवळ घोषणा नव्हती, तर आत्मविश्वासाचे प्रतीक होते. 'महाजन जे बोलतात ते करून दाखवतात' ही त्यांची ओळख असल्यामुळेच या घोषणेनंतर विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली. निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना अचूकपणे हेरत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. या निर्णयामुळे काही निष्ठावंत दुखावले गेले. आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, निवडणुकीच्या निकालाने महाजन यांची रणनीती योग्य ठरवली. प्रभाग १३ मधील आयाराम प्रकरणाने भाजपमध्ये गोंधळ उडवला होता. तरीही अदिती पांडे, शाहू खैरे यांचा विजय हा निर्णयाचा सकारात्मक परिणाम ठरला. एबी फॉर्मच्या पळवापळवीत प्रभाग २५ आणि २९ मध्ये गोंधळ झाला नसता तर भाजपच्या आणखी ४ जागा वाढल्या असत्या. हे राजकीय विश्लेषक मान्य करतात.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत गिरीश महाजन नाशिकमध्येच तळ ठोकून होते. प्रत्येक हालचालीवर त्यांचे बारकाईने लक्ष होते. उमेदवारी न मिळालेल्या नाराजांशी थेट वन-टू-वन चर्चा करत त्यांनी केलेले डॅमेज कंट्रोल निर्णायक ठरले. २०१७ मधील ६६ जागांवरून भाजपचा विजयाचा आकडा थेट ७२ वर पोहोचला. हा आकडा केवळ संख्यात्मक नाही तर नेतृत्वाच्या कसोटीचा ठोस पुरावा आहे. विरोधकांच्या आरोपांचा मारा, अंतर्गत नाराजी आणि कठीण निर्णयांची जबाबदारी या सगळ्यांचा सामना करत महाजन यांनी भाजपची सत्ता पुन्हा खेचून आणली. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच निष्कर्ष ठळकपणे मांडला जात आहे. भाजप अडचणीत असताना गिरीश महाजन हेच नाशिकचे संकटमोचक ठरतात.
नीलेश बोरा विजयामागील सूत्रधार
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पडद्यामागून सूत्र हलविणारे नीलेश बोरा हे भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहे. गिरीश महाजनांचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेले बोरा यांना पक्षांतर्गत विरोधाचाही सामना करावा लागला. मात्र, महाजन खंबीरपणे पाठीशी असल्याने बोरा यांनी भाजपच्या विजयाचे गणित आखले, निवडणूक प्रचाराचे सुयोग्य नियोजन करताना मतदान केंद्रांवरील बूथ यंत्रणा सुयोग्यपणे हाताळली. भाजपला विजयाचा ७२ जादुई आकडा गाठून देण्यात बोरा यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.
भाजपला अजून १० ते १५ जागा मिळायला हव्या होत्या. तरीही आम्हाला ७२ जागा मिळाल्याने सर्व नाशिककर, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. नाशिककरांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू.- गिरीष महाजन, कुंभमेळा मंत्री