सिडको: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गुरूवारी (दि.१५ जानेवारी) मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सावतानगर येथील एका कार्यालयात पैशांचे वाटप होत असल्याच्या संशयावरून अपक्ष उमेदवार आणि शिंदे सेनेचे उमेदवार आमने-सामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अखेर सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले.
प्रभाग २५ मध्ये मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच, सावतानगर येथील एका कार्यालयात पैसे वाटले जात असल्याची चर्चा पसरली. या माहितीनंतर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे हे आपल्या समर्थकांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले आणि खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेऊन गाडीत बसवले. मात्र, काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.
शहाणे यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. याच दरम्यान शिंदे सेनेचे उमेदवार ॲड. अतुल सानप हे देखील समर्थकांसह तिथे पोहोचले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमक उडाली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण होते.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक मागवली. जमाव पांगवण्यासाठी आणि वाद थांबवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्ते पांगले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. सध्या या भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.