नाशिक : घरात असूनही एकटे आहोत, मुलगा परदेशात आहे, नातेवाइकांनी घराबाहेर काढले अशा वेदनादायक अनुभवांची कहाणी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ज्येष्ठ नागरिक 'एल्डर लाइन १४५६७' या हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत. ज्येष्ठांच्या अडचणी ऐकून घेणारी, त्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत देणारी ही सेवा आज अनेकांसाठी आधारवड ठरत आहे.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य घेऊन जनसेवा फाउंडेशन गेल्या ३७वर्षांपासून सातत्याने समाजसेवेचे कार्य करत आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गरीव, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, महिला तसेच गरीब मुला-मुलींसाठी विविध कल्याणकारी प्रकल्प राबविले जात आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जाही प्राप्त झाला आहे.
प्रमुख मोफत सेवा
आरोग्य, पोषण, निवारा, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर्सबाबत माहिती. कायदेशीर, मालमत्ता व कौटुंबिक वादांत मोफत सल्ला पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांचे चरितार्थ व कल्याणाबाबत माहिती. मानसिक ताण, चिंता, एकटेपणा, नैराश्य यावर समुपदेशन व आधार. छळ, बेघरपणा किंवा अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत कुटुंबीयांशी संवाद, पोलिस समन्वय व आवश्यक ते पुनर्वसन.
उल्लेखनीय कामगिरी
ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या एल्डर लाइन १४५६७ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३० हजारांहून अधिक प्रकरणांत तत्काळ मदत करण्यात आली आहे.
एल्डर लाइन १४५६७ ही केवळ हेल्पलाइन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते.
- डॉ. विनोद शाह, संस्थापक