नाशिक : महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत राज्यातील ३७ एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळांमध्ये (सीबीएसई संलग्न) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता ३ हजार ९३ जागांसाठी १ मार्च रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा होणार आहे.
परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला १५ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली असून, याबाबत माहितीसाठी http://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांनी केले.
पूर्वपरीक्षेसाठी इयत्ता ६ वीच्या २ हजार २२०, तर इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ जागांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व सीबीएसई बोर्डाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल चालविल्या जातात. या शाळांमधील सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीच्या २ हजार २२० जागांवर पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार असून, यात १ हजार १०० मुली, तर १ हजार १०० मुलांच्या जागा असणार आहेत.
इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता सातवीच्या ४००, आठवीच्या २९०, तर नववीच्या १८३ जागा रिक्त असून, या जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत.
नाशिक - ११९२
नागपूर - ९२३
ठाणे - ५३
अमरावती - ३१५
"सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी ६० प्रवेश क्षमता असणार आहे. तर इयत्ता सातवी, आठवी व नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. या सर्व जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल."- लीना बनसोड, सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी