वेटरकडून सव्वा लाखाचे घेतले साडेआठ लाख ; सावकारासह चौघांविरोधात गुन्हा File Photo
नाशिक

Nashik | वेटरकडून सव्वा लाखाचे घेतले साडेआठ लाख ; सावकारासह चौघांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पोलिस आयुक्तालयात झालेल्या ओळखीच्या जोरावर एक लाख ३० हजार रुपयांचे कर्ज दिल्यानंतर खासगी सावकार व त्याच्या नातलगांनी वेटरकडून व्याजापोटी तब्बल ८ लाख ४५ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक उघड झाला आहे. विशेष म्हणजे, संशयित सावकार हा पोलिस असल्याचा संशय असल्याने या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.

हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या दशरथ पंडित साबळे (४४, रा. रामनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित सावकार सुनील अर्जुन महाजन, त्याची पत्नी ज्योत्स्ना महाजन, शालक दीपक महाजन व चुलत सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साबळे हे २००७ पासून हॉटेलिंगसाठी जागा भाड्याने देणे, कामगार-वेटर पुरविणे, परवाने काढून देणे ही कामे करतात. २०१२ मध्ये परवान्याच्या कामासाठी पोलिस आयुक्तालयात गेल्यानंतर त्यांची संशयित सुनील महाजनसोबत ओळख झाली. दरम्यान, २०१६ मध्ये साबळे यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याने पैशांची गरज भासल्याने त्यांनी ५ मार्च २०१६ रोजी सुनीलकडून ३० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले. या रकमेपोटी साबळे यांनी सुनीलला दरमहा तीन हजार रुपये व्याज दिले. मात्र, पुन्हा गरज भासल्याने १ ऑगस्टला त्यांनी पुन्हा एक लाख रुपये धनादेशाद्वारे घेतले. त्यामुळे एक लाख तीस हजारांवर दरमहा तेरा हजारांचे व्याज साबळे सुनील यांना देत होते. २०२० पर्यंत नियमित हप्ते देत त्याची डायरीत नोंद ठेवली. त्यानंतर संशयितासह चुलत सासरे साबळे यांच्याकडे आले. त्यांनी तुझ्याकडे 'अद्याप पाच लाख रुपये बाकी असून, तुझी शेतजमीन आमच्या नावे कर', अशी मागणी केली. त्यावर माझ्याकडे शेतजमीन नाही तसेच मी संपूर्ण पैसे व्याजासह परत दिल्याचे साबळे यांनी सांगितले. त्यानंतर संशयितांनी साबळे दाम्पत्यास शिवीगाळ केली. १ मार्च २०१९ रोजी फिर्यादीने खासगी बँकेतून सात लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. त्यातून संशयिताला एक लाखांचा चेक दिला. तरीही संशयितांनी तगादा लावल्याने साबळेंनी ५ मार्च रोजी ३४ हजार ५८६ रुपये रोख रकमेसह २ लाख रुपये व मागील व्याज एक लाख आणि ३५ हजारांचे तीन हप्ते व अधिक ६५ हजार ४१४ रुपये दिले. पुन्हा व्याजापोटी पन्नास हजार दिले. त्यानंतरही संशयित दाम्पत्याने ८ लाख रुपये व दरमहा चक्रवाढ व्याजाने २३ हजार ९६२ रुपयांची मागणी केली. त्यास नकार दिल्याने महाजनने 'मी पोलिस अधिकारी आहे. तुझी कधी वाट लावेल, हे कळणारदेखील नाही', अशी दमबाजी केली. तसेच अंबड पोलिस ठाण्यातून बोलत आहे, असे सांगून ७२७६०१९७६६ क्रमांकावरून साबळे यांना धमक्या दिल्या. हा मोबाइल क्रमांक एका वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नावे नोंद असल्याचे समजते.

सावकार पोलिस?

साबळे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित महाजन व इतरांनी वारंवार शिवीगाळ करून 'तुला जेलमध्ये टाकेन, मुलींना मारून टाकेन' अशा धमक्या दिल्या. त्यामुळे साबळे कुटुंबाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत तक्रार केली. त्यानुसार, आयुक्तांनी तातडीने गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक सुशील जुमडे यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. संशयित पोलिस असल्याचा दावा साबळे यांनी केला आहे. त्यामुळे पोलिस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.

असे छळले

- साबळे दाम्पत्य दवाखान्यात असताना घरी दोन्ही मुली एकट्या असताना संशयिताने घराच्या दरवाजाला लाथा मारून शिवीगाळ केली.

- व्याजापोटी घरातील टीव्ही उचलून नेला.

- संशयितांचे मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतर संशयिताने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करून त्रास दिला.

- नातलग व शेजारच्यांमध्ये साबळे कुटुंबीयांची बदनामी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT