मालेगाव : नीलेश शिंपी
मतदारसंघातील मतदारांच्या आभार दौर्यावेळी नवनिर्वाचित शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील देवारपाडे येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. भुसे हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच रविवारी (दि. 22) मालेगावी आले. यावेळी महायुतीच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यानंतर शिवसेना संपर्क कार्यालयाजवळ छोटेखानी सभेत त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून आपला कारभार कसा असेल हे स्पष्ट केले होते. यावेळी भाषणात त्यांनी शिक्षणमंत्री एखाद्या खेडेगावातील शाळेला अचानक भेट देत असताना तुम्हाला दिसतील, असे सांगितले होते. त्याला 24 तास होत नाहीत तोच भुसे हे सोमवारी (दि. 23) तालुक्याच्या आभार दौर्यावर असताना देवारपाडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून 191 पटसंख्या आहे. यावेळी भुसे यांनी हजेरी पत्रकाची तपासणी करून मुख्याध्यापिका सुनंदा सोनवणे यांच्यासह शिक्षकांबरोबर चर्चा केली. त्यानंतर ते थेट वर्गात गेले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना वाचन करायला लावले. शाळेची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येईल. खासगी शाळेत मिळतात अशा उच्च दर्जाच्या सोयीसुविधा ग्रामीण भागाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील.दादा भुसे, शिक्षणमंत्री
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. शाळेसंदर्भातील समस्या व अडचणींबाबत भुसे यांना माहिती दिली. त्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.सुनंदा सोनवणे, मुख्याध्यापिका, नाशिक