Dwarka-Nashik Road 
नाशिक

Nashik Dwarka Circle | नाशिककरांसाठी मोठी बातमी! द्वारका सर्कलचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; 80 टक्के काम पूर्ण

Nashik Dwarka Circle | जानेवारी २०२७ मध्ये द्वारका इंटरचेंज सुरू होणार? २१३ कोटींच्या प्रकल्पाला वेग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख केंद्र असलेल्या द्वारका सर्कलवरील इंटरचेंज प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२७ अखेरपर्यंत या प्रकल्पातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे रोड ते नाशिक शहरादरम्यान वाहनांसाठी १०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग उभारण्यात येत असून, त्यामुळे द्वारका चौकातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) २१३.८७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुंबई-आग्रा महामार्ग, पुणे रोड, नाशिक रोड आणि शहरांतर्गत वाहतुकीचा मोठा भार द्वारका सर्कलवर येत असल्याने येथे दररोज वाहतूक कोंडी होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. एकूण ५६३ मीटर लांबीच्या इंटरचेंजमध्ये १०० मीटरचा व्हेईक्युलर अंडरपास उभारण्यात येत आहे. पुणे बाजूकडील रॅम्प आणि भुयारी मार्गाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील ५३ मीटरचे बांधकामही पूर्ण झाले असून, सध्या काँक्रीट मजबुतीकरणासाठी क्युरिंग प्रक्रिया सुरू आहे. नाशिक बाजूकडील रॅम्प, सर्व्हिस रोड आणि विविध सुविधांच्या वाहिन्यांचे स्थलांतर सुरू आहे.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. जानेवारीअखेर मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट असून, कुंभमेळ्यापूर्वी नागरिक आणि भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई आणि धुळे बाजूकडील यू-टर्न सुविधांची कामे दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असून, ती कुंभमेळ्यानंतर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारी २०२७ अखेर संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर द्वारका परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास नाशिकच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  • मुख्य मार्ग सुरू करण्याचे उद्दिष्ट : जानेवारी २०२७ अखेर

  • संपूर्ण प्रकल्पाची मुदत : फेब्रुवारी २०२७ अखेर

  • प्रकल्प खर्च : २१३.८७ कोटी रुपये

  • एकूण लांबी : ५६३ मीटर

  • भुयारी मार्ग : १०० मीटर

  • पुणे बाजूचा अ‍ॅप्रोच रोड : २४० मीटर

  • नाशिक बाजूचा अ‍ॅप्रोच रोड : २२३ मीटर

  • सद्यस्थिती पूर्ण काम : ८० टक्के

द्वारका-दत्तमंदिर सहापदरीकरणासाठी 132 ठिकाणी होणार सीमांकन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक या ६.४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाला महापालिकेने वेग दिला आहे. या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने नगररचना विभागाने रस्त्यावर १३२ ठिकाणी सीमांकन (डिमार्केशन) करून दिले आहे.

दरम्यान द्वारका सर्कल, नासर्डी पूल आणि ममता थिएटर परिसरातील जागा संपादनासाठी संबंधित जागामालकांना टीडीआरचा पर्याय देण्यात आला आहे. सिंहस्थापूर्वी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. द्वारका ते दत्तमंदिर दरम्यानच्या ६.४ किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासह दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोनपदरी सेवा रस्ते उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २२१.५२ कोटी रुपयांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आहे.

निविदा प्रक्रियेत व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सर्वात कमी दराची निविदाधारक ठरली असून, कंपनीने जीएसटी वगळून १७७.७४ कोटी रुपयांची निविदा सादर केली आहे. काम सुरू करण्यापूर्वी किमान ९० टक्के रस्त्याच्या लांबीमध्ये ४५ मीटर रुंदीची अतिक्रमणमुक्त जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) मागण्यात आले आहे.

त्यामुळे उर्वरित जागा संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली वाढवल्या आहेत. सिंहस्थापूर्वी काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदारासोबत बैठक घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १३२ ठिकाणी सीमांकन करण्यात आले आहे.

संबंधित जागामालकांना टीडीआरचा पर्याय

प्रस्तावित सहापदरीकरण आणि सेवा रस्त्यांसाठी ४५ मीटर रुंदीची जागा आवश्यक आहे. सध्या या मार्गाची रुंदी वेगवेगळ्या ठिकाणी २४ ते ३० मीटर आहे. त्यामुळे अतिरिक्त १५ ते २० मीटर जागेची अतिरिक्त जागा संपादित करावी लागणार आहे. विशेषतः द्वारका सर्कल, नासर्डी पूल आणि ममता थिएटर परिसरात अतिरिक्त जागा संपादित करावी लागणार आहे.

यासाठी संबंधित जागामालकांसमोर विकास हक्क हस्तांतरण अर्थात टीडीआरचा पर्याय ठेवण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून जागामालकांशी चर्चा सुरू असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जागा संपादनातील अडथळे दूर करून प्रकल्पाला प्रत्यक्ष गती देण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT