मागील आठ दिवसांत तीनशेपेक्षा अधिक फ्लॅटचे बुकींग झाले असून, वाहन बाजारातही मोठी तेजी आहे. file photo
नाशिक

Nashik Dussehra Booking | ३०० फ्लॅट, २५० चारचाकी, तीन हजार दुचाकी बुकिंग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'दसरा सण मोठा, खरेदीला नाही तोटा' याप्रमाणे नाशिककर यंदा विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदीचे सिमोल्लंघन करणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रासह वाहन आणि सराफ बाजारात तेजीचे वातावरण असून, यंदा नाशिककरांकडून जोरदार खरेदी केली जाण्याची अपेक्षा व्यावसायिकांना आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात मागील आठ दिवसांत तीनशेपेक्षा अधिक फ्लॅटचे बुकींग झाले असून, वाहन बाजारातही मोठी तेजी आहे. २५० चारचाकी आणि तीन हजार दुचाकींची बुकींग करण्यात आली असून, मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्याचा ग्राहकांचा मानस आहे.

ग्रामीण अर्थकारणावर नाशिकचे वाहन आणि रिअल इस्टेट क्षेत्र बऱ्यापैकी अवलंबून आहे. यंदा वरुणराजाची कृपादृष्टी चांगली झाल्याने ग्रामीण भागातही उत्साह अन् तेजीचे वातावरण आहे. त्यातून दसऱ्यानिमित्त अनेक विक्रेत्यांनी खास सवलत, मोफत भेटवस्तूंची घोषणा केली आहे. यंदा नव्या कपड्यांबरोबरच, वाहने, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याचा अंदाज असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहक भर देण्याची शक्यता आहे.

दसऱ्यापाठोपाठ येणाऱ्या दिवाळीनिमित्त कपडा बाजारपेठेतील व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या रेडिमेड कपड्यांचा साठा करून ठेवला आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनाही यंदा मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे. मोबाइल, लॅपटॉप, वॉशिंग मशिन, अँड्राइड टीव्ही, ओव्हन यांना चांगली मागणी असण्याची शक्यता गृहीत धरून वितरकांनी त्यासाठी तजवीज केली आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झीरो डाउन पेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्याने मुहूर्तावर अनेकांकडून जोरदार खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

चारचाकी डिलिव्हरीचे आव्हान

अनेक ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर चारचाकी घरी आणता यावी, या बेताने बुकिंग केली आहे. काही कंपन्यांच्या कारसाठी तीन महिन्यांची वेटींग असल्याने ग्राहकांना मुहूर्तावर डिलिव्हरी देण्याचे मोठे आव्हान डिलर्ससमोर आहे. दसऱ्याला वाहन ताब्यात मिळावे, यासाठी वितरकांच्या दालनात ग्राहकांची शुक्रवारीच (दि.४) गर्दी दिसून आली.

सोने दरवाढ, खरेदीचा उत्साह

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीत माेठी दरवाढ बघावयास मिळत आहे. सोने दर ७७ हजारांच्या पार असून, चांदीतही मोठी तेजी आहे. सोने-चांदी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असले तरी, गुंतवणूकदार मात्र खरेदीसाठी सरसावले आहेत. मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. सराफ व्यावसायिकांनी मजुरीत सुट तसेच सोने खरेदीवर चांदी फ्री अशाप्रकारच्या योजना उपलब्ध करून दिल्याने, मुहूर्तावर ग्राहकांकडून या योजनांचा लाभ घेतला जाण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री आवास योजना २.०

प्रधानमंत्री आवास योजना, शहरी २.० घोषित करण्यात आल्याने, घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. विशेषत: परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी असून, अवघ्या आठच दिवसांत तीनशेपेक्षा अधिक सदनिकांची बुकींग झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांचा गृहप्रवेशाचा विचार असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. बुकींग वाढल्याने, बँकांमध्येही तेजीचे वातावरण बघावयास मिळत आहे.

नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त बांधकाम क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. शहराच्या चहुबाजुने असलेल्या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात बुकिंगचा धडाका सुरू आहे. अवघ्या आठच दिवसांत तीनशेपेक्षा अधिक सदनिकांची बुकिंग झाली आहे. दिवाळीपर्यंत ही तेजी कायम राहणार आहे.
- सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT