नाशिक

Nashik Drug Case : एमडी प्रकरणी पिवाल-पगारे टोळीवर मोक्का

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सामनगाव येथील एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जविक्री प्रकरणामुळे पोलिसांच्या रडारवर आलेल्या अर्जुन पिवाल याच्यासह सनी पगारे व इतर संशयितांच्या टोळीवर शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. या टोळीतील बहुतांश गुन्हेगारांना गुन्हे शाखेने अटक केली असून, इतर तीन ते चार संशयित अद्याप फरार आहेत. (Nashik Drug Case)

एमडी विक्री करताना नाशिकरोड पोलिसांनी गणेश शर्मा या संशयितास पकडले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने सखोल तपास करीत यातील एमडीविक्रेते, पुरवठादार, एमडी तयार करणाऱ्या संशयितांची धरपकड केली. तसेच सोलापूर येथील दोन कारखानेही उघडकीस आणले. या गुन्ह्यातील संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. त्यांच्यावर या आधी गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांनी संघटितपणे एमडी तयार करून त्याचे वितरण केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या दिशेने तपास करत पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव तयार केला. या टोळीचा म्होरक्या अर्जुन पिवाल हा अद्याप फरार आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण ११ संशयितांना अटक केली आहे. पिवाल याच्यासह अन्य मुख्य संशयितांना अटक करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक परराज्यात आहे. (Nashik Drug Case)

मोक्कातील संशयित (Nashik Drug Case)

सनी पगारे, अर्जुन पिवाल, वैजनाथ सुरेश हावळे, गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सुमित पगारे, मनोज गांगुर्डे, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे, मनोहर काळे, प्रथमेश मानकर या संशयितांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अन्य तीन ते चार संशयितांचाही यात समावेश होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT