Nashik Rabi Sowing  
नाशिक

Nashik Rabi Sowing Delayed | पाऊस नाही, पाणी नाही अन् पेरण्याही रखडल्या; नाशिकमध्ये दुष्काळाचा शेतीला मोठा फटका

Nashik Rabi Sowing Delayed | जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामातील पेरण्यांनाही बसला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामातील पेरण्यांनाही बसला आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने आणि सिंचनाचे स्रोत आटल्याने रब्बीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत.

परिणामी, शेतकऱ्यांकडून खतांना मागणीच नसल्याने जिल्ह्यात तब्बल ८३ हजार ३९६ मेट्रिक टन खतसाठा पडून असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामाचे नियोजन करताना कृषी विभागाने जिल्ह्यासाठी २ लाख ६३ हजार मेट्रिक टन खतांची मागणी शासनाकडे नोंदवली होती.

या मागणीच्या तुलनेत शासनाकडून २ लाख ३२ हजार ९०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले. नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत शासनाकडून मंजूर आवंटनापैकी ७० हजार १२२ मेट्रिक टन खतसाठा जिल्ह्याला प्रत्यक्ष प्राप्त झाला आहे.

जुन्या शिल्लक साठ्यामुळे आणि नव्याने प्राप्त झालेल्या आवंटनामुळे जिल्ह्यात सध्यास्थितीत एकूण ८३ हजार ३९६ मेट्रिक टन इतका मुबलक खतसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, पेरण्यांना अद्याप वेग न आल्याने खतांची उचल अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३ हजार ६३६ मेट्रिक टन खतांचीच प्रत्यक्ष विक्री होऊ शकली आहे.

मंजूर आवंटनापैकी अद्याप ६४ हजार ९०४ मेट्रिक टन खतांचे आवंटन जिल्ह्याला प्राप्त होणे बाकी आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेला साठाच पडून असल्याने विक्रेते आणि कृषी विभाग चिंतेत आहेत.

पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या लांबणीवर टाकल्या असून, याचा थेट परिणाम कृषी निविष्ठांच्या बाजारपेठेवर झाला आहे. जोपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही किंवा पेरण्यांना गती मिळत नाही, तोपर्यंत खतांची मागणी वाढण्याची चिन्हे नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

बियाण्यांच्या मागणीतही मोठी घट

जिल्ह्यात खतांना मागणी नसतानाच बियाण्यांच्या मागणीतही मोठी घट झाली आहे. रब्बी हंगामासाठी १ लाख १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी ३९ हजार १७१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी जिल्ह्याला १४ हजार ९९ क्विंटल बियाण्यांचा प्रत्यक्ष पुरवठा झाला आहे. मात्र, पेरण्या रखडल्याने यापैकी आतापर्यंत केवळ ४ हजार ७३२ क्विंटल बियाण्यांचीच विक्री झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT