Nashik drought slow panchanama pace 
नाशिक

Nashik drought slow panchanama pace| दुष्काळग्रस्त तालुक्यांत कासवगतीने पंचनामे

१,३३९ गावांत अद्यापही केवळ ४.४८ टक्के काम पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळाच्या पहिल्या टप्प्यातील ट्रिगर १ लागू झालेल्या १० तालुक्यांमधील पंचनाम्यांची स्थिती अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. यात गुरुवारी (दि.१) समोर आलेल्या अहवालानुसार केवळ ४.४८ टक्के गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे दुष्काळी मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पंचनामा अहवाल प्रगतीबाबत कृषी सचिव दैनंदिन आढावा घेणार असून, दररोज सायंकाळी ५ पर्यंत माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त दहा तालुक्यांमध्ये एकूण १३३९ गावे, ५,९२,६१६ हेक्टर पेरणी क्षेत्र आणि ५,६०,९६० खातेदार आहेत.

यापैकी गुरुवार (दि. १) सायंकाळपर्यंत ३२ गावांमध्ये ४३६८ हेक्टरवरील पंचनामे झाले असून, आतापर्यंत एकूण ६० गावांमध्ये ८४०३ हेक्टर व १०, १५४ खातेदारांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. म्हणजेच प्रातिनिधिक स्वरूपात क्षेत्राची केवळ १.४२ टक्के आणि ३ टक्के खातेदारांची तपासणी झाली आहे.

या अहवालात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ज्या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे, तिथेच पंचनाम्यांचे काम सर्वात कमी आहे. यात इगतपुरीत १२६ गावांपैकी फक्त १ गावात ०.७९ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, सुरगाणातील १९१ गावांपैकी २ गावांमध्ये १.०५ टक्के, पेठच्या १४६ गावांपैकी २ गावांत १.३७, सिन्नरमध्ये १३१ गावांपैकी ४ गावांत ३.०५ टक्के कळवणला १५२ गावांपैकी ५ गावांत ३.२९ टक्के, तर देवळा आणि येवल्यात तुलनेने बरे प्रमाण दिसून येत आहे. यात देवळ्यात सर्वाधिक नऊ गावांमध्ये १९.५७ टक्के, तर येवला तालुक्यात १० गावांमध्ये ८.०६ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

ट्रिगर एक लागू असलेले १० तालुके

नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमध्ये ट्रिगर एक लागू करण्यात आला आहे. यात पंचनामे करण्यात आदेश निर्गमित करण्यात आले असून, सर्व तालुक्यांत पंचनामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष टक्केवारी पाहता प्रशासनाने गती वाढवणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT