नाशिक: जिल्हा रुग्णालयातील आयुर्वेद विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर आणि मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी आरोग्य उपसंचालकांकडे पाठविला आहे.
दोन्ही डॉक्टर राजपत्रित अधिकारी असल्याने नियमानुसार त्यांच्या निलंबनाबाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांनी ६ मार्च रोजी गंगापूर रोड परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या भगिनी रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीनुसार पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मृत डॉ. जेजुरकर यांच्या नातेवाइकांनीही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी डॉ. निलेश जेजुरकर, तर २० सप्टेंबर रोजी डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक केली. दोघेही आरोग्य विभागातील जिल्हा रुग्णालयातील राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांमार्फत आरोग्य आयुक्तांकडे शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सांगितले. शासनस्तरावर निलंबनाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून पोलिस तपासात उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर बाबींची पडताळणी केली जात आहे. प्रशासकीय कारवाईचा अंतिम निर्णय शासनस्तरावर होणार आहे. याकडे वैद्यकीय क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.