Maharashtra Dam Pudhari
नाशिक

Nashik Dam Water Level 2026 | नाशिकवर पाणीटंचाईची टांगती तलवार! नाशिककरांनो पाणी जपून वापरा; बाष्पीभवनामुळे साठा घटण्याचा धोका

Nashik Dam Water Level 2026 | उष्णतेने बाष्पीभवनाचा धोका; काही भागांत पाणी जपून वापरण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

गतवर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे विभागातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी नाशिक जिल्ह्यातील साठा मागील वर्षाच्या तुलनेत फारसा वाढलेला नसल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता कायम आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, पुढील अडीच ते तीन महिन्यांत पाण्याची मागणी वाढणार आहे.

त्यातच वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा परिणाम साठ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभागातील २२ मोठ्या धरणांमध्ये सध्या ३,९१९.७९ दशलक्ष घनमीटर इतका एकूण साठा असून, त्यापैकी २,४५४.३९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा उपलब्ध आहे.

हा साठा मागील वर्षीच्या ५८.१२ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ६२.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मध्यम प्रकल्पांमध्येही सुमारे १० टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. लघु प्रकल्पांमध्ये ५८७. २६ दशलक्ष घनमीटर साठा असून, त्यापैकी २८७.५४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त आहे. एकूण ३१९ प्रकल्पांमध्ये ५,५२३.६६ दशलक्ष घनमीटर साठा असून, त्यापैकी ३,४७७.२० दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध आहे.

मागील वर्षी हा आकडा ५५.३३ टक्के होता, तर यंदा तो वाढून ६२.९५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे एकूणच परिस्थिती समाधानकारक असली, तरी नाशिक जिल्ह्यातील साठा फक्त ५९.६० टक्के असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

याउलट नंदुरबार जिल्ह्यात टक्केवारीने सर्वाधिक साठा (८५.८३ टक्के) नोंदविला गेला असला, तरी प्रत्यक्ष पिण्यायोग्य पाण्याचा साठा मर्यादित असल्याचे चित्र आहे. काही धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत घट, तर काही ठिकाणी किरकोळ वाढ दिसून येत आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक पिछाडीवर

राज्यात गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने बहुतेक धरणे भरून वाहात होती. त्यामुळे यंदाही समाधानकारक साठ्याची अपेक्षा होती; मात्र नाशिक जिल्ह्यातील आकडेवारीत अपेक्षित वाढ दिसून आली नाही. त्यामुळे शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार कायम आहे.

प्रशासन पाणीपुरवठ्यासाठी सज्ज

विभागीय प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला असून, सध्या कुठेही आपत्कालीन पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्यास टंचाईची समस्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT