नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राबविलेल्या गैरमार्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कॉपीमुक्त अभियानाचा यंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालावर लक्षणीय परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले.
फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी शासन आणि मंडळ स्तरावर व्यापक नियोजन करण्यात आले होते. कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, भरारी पथके, कडक कारवाईची तरतूद आणि परीक्षा केंद्रांभोवती प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. दि. १९ ते २६ जानेवारी दरम्यान जनजागृती सप्ताह आयोजित करीत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
परीक्षा काळात केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवणे, गैरप्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कडक अंमलबजावणी आणि राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय दक्षता समित्यांच्या माध्यमातून देखरेख वाढविण्यात आली होती. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला होता. सोशल मीडियाद्वारेही विद्यार्थ्यांना योग्य संदेश देण्यात आले.
या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा वातावरण अधिक पारदर्शक आणि भयमुक्त झाले. परिणामी कॉपीचे प्रमाण घटले असून, विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्तेचे प्रतिबिंब निकालात दिसले. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत २.०९ टक्क्यांनी कमी आहे. विभागाचा निकाल ९०.७२ टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत ०.५९ टक्के कमी आहे.
घसरण नकारात्मक नव्हे
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, निकालातील ही किंचित घसरण ही नकारात्मक नसून, कॉपीमुक्त अभियानाच्या यशाचीच खूण आहे. पूर्वीच्या तुलनेत कृत्रिमरीत्या वाढणारे गुण कमी झाले असून, गुणवत्ताधारित निकालाची दिशा मजबूत झाली आहे.