नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील १२७ गावांना पाणीटंचाईने ग्रासले असून, प्रशासनातर्फे या गाव व पाड्यांवर ४४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ७५ हजार ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. काही ठिकाणी टँकर भरून पाणीपुरवठा करता यावा म्हणून १६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे अक्षरशः पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे धरणातील पाणीपातळीत तसेच गाव - शिवारातील विहिरी - कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणे अपेक्षित असताना दुसरीकडे मात्र पाणीटंचाईचे संकट झपाट्याने वाढतच आहे.
मागील आठवड्यात केवळ ९८ गाव-पाडे टंचाईच्या छायेत होते. त्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. टंचाईग्रस्त गावांचा आकडा १२७ वर गेला आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखडा यापूर्वीच करून ठेवला आहे. त्यात योग्य उपाययोजनांचे नियोजन आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जेथे टंचाई तेथे तत्काळ उपाययोजना राबवून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा, इगतपुरी, मालेगाव, पेठ, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये काही गावांना पिण्याचा पाण्याची टंचाई जाणवत आहे. टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत स्तरावरून जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे प्रस्ताव पाठविले होते.
जिल्हा प्रशासनाने ते तत्काळ मंजूर करत ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३१ टैंकर मंजुरीचे आदेश दिले होते. त्यात आता वाढ झाली आहे. १२७ गावांसाठी आता ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर काही ठिकाणी टँकर मंजूर केले, मात्र ते भरण्यासाठी विहिरीत पाणी नाही, त्यामुळे तशी परिस्थिती असलेल्या ६ गावांना १४ विहिरी अधिग्रहीत करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.