तिलारी धरणात 99 टक्के जलसाठा (Pudhari File Photo)
नाशिक

Nashik Water Crisis | उन्हाचा तडाखा अन् बाष्पीभवन! नाशिकच्या धरणांमध्ये आता फक्त 46 टक्के जलसाठा शिल्लक

Nashik Water Crisis | 127 गावांना जाणवतेय पाणीटंचाई, 44 टँकरद्वारे भागविली जातेय तहान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आठवडाभरात उन्हाची तीव्रता जसजशी वाढत आहे, तसतसे जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यात घट होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात असल्यामुळे १२७ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठाही घटण्यास सुरुवात झाली आहे. उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन जलसाठ्यावर परिणाम जाणवत आहे. मागील १० ते १२ दिवसांमध्ये चार टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यात ४६ टक्के इतका पाणीसाठा राहिला आहे. जिल्ह्यात एकूण २६ लहान मोठे सिंचन प्रकल्प आहेत.

यामध्ये गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे, कडवा, चणकापूर, गिरणा या सात मोठ्या धरणांचा समावेश होतो. मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिलच्या पहिल्या १० दिवसांत ३४.७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता. यावर्षी त्यापेक्षा काही टक्के अधिक आहे;

मात्र उन्हाचा तडाखादेखील वाढत असल्याने बाष्पीभवनही वेगाने होत आहे. पाणीपातळी कमी होत असून, जिल्ह्यात मागील वर्षी या हंगामात ७७२.२ मिमी इतका पाऊस पडला होता. २०२४ ला पर्जन्यमानाच्या तुलनेत हे पर्जन्यमान जवळपास ३०० मिलीमीटरने कमी होते.

पाणीसाठ्यांमधून कालव्यांद्वारे शेतीसाठी आणि एकलहरे औष्णिक प्रकल्पासाठीही आवर्तने सोडली जातात. पिण्याच्या पाण्याची गरजही भागविली जाते. धरणातील पाणीसाठा हा चालू महिन्याच्या पंधरवडा आणि मे महिन्याचा संपूर्ण महिनाभर पुरवायचा आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन दुप्पट प्रमाणात साठा घटतो

जिल्ह्यात 127 गावांमध्ये पाणीटंचाई

जिल्ह्यातील १२७ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्या गावांमध्ये प्रशासनाने ४४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. एक टँकर किमान दोन फेऱ्या मारत आहे. दररोज ८२ फेऱ्यांद्वारे गाव-पाड्यांतील टंचाई दूर केली जात आहे. तसेच काही ठिकाणी १६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

येथून होतो शहराला पाणीपुरवठा

नाशिक शहराला गंगापूर, गौतमी, कश्यपी, मुकणे या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दररोज तब्बल ७०० ते ७२० दशलक्ष लिटर इतके पाणी लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT