नाशिक, धनराज माळी
जिल्ह्यातील महसूल विभागाने जमीन व गौण खनिज महसूल वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वसुलीला वेग दिला आहे. यावर्षी ४७७ कोटी ७५ लाख ६८ हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबरअखेर १७४ कोटींचा महसूल वसूल झाला आहे. काही अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात जबाबदारीवर असल्याने काहीअंशी वसुलीवर परिणाम जाणवत आहे. मार्चअखेरपर्यंत उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्ह्यातील जमीन व गौण खनिज
वसुलीसाठी २०२५-२६ साठी जमीन महसूलसाठी २२७ कोटी ७५ लाख ६८ हजाराचे उद्दिष्ट ठेवले आहे. गौण खनिज वसुलीसाठी २५० कोटी असे एकूण ४७७कोटी ७५ लाख ६८ हजारांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट आहे.
तहसीलदार आबासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जमीन व गौण खनिज वसुलीचे काम सुरू आहे. मात्र नगर परिषद, महापालिका निवडणुका सुरू झाल्या. या निवडणूक कामांसाठी महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे काहीअंशी वसुलीला ब्रेक लागला आहे. तरीही आतापर्यंत महसूल विभागाने चांगली वसुली करण्याचा प्रयत्न केला आहे. जमीन महसुलीच्या २२७ कोटी ७५ लाख ६८ हजारांच्या उद्दिष्टापैकी ६४ कोटी ९२ लाख ३४ हजारांची वसुली झाली आहे. म्हणजे जमीन वसुलीची २८.५१ टक्के वसुली झाली आहे. गौण खनिज वसुलीत २५० कोटींच्या उद्दिष्टापैकी १०९ कोटी ४ लाख ३६ हजारांची वसुली झाली आहे. म्हणजे ४३.६२ टक्के वसुली झाली आहे. जमीन व गौण खनिज अशी एकूण ४७७ कोटीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १७३ कोटींची वसुली झाली आहे. म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या ३६.४१ टक्के वसुली झाली आहे. मार्चअखेर दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी दिली.