नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगामाच्या सुरवातीला दमदार हजेरी लावून, नंतर दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसला. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे भीषण सावट पसरले असून, तब्बल ६ लाख ४४ हजार २८९ हेक्टरमधील पिके करपून खाक झाली आहेत.
या नैसगिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ३ हजार ३०६ गावांमधील ६ लाख ८७ हजार ६५ बळीराजा संकटात सापडला आहे. प्रशासकीय पातळीवर पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ६५८ कोटी ६० लाख ३६ हजार रुपयांच्या तातडीच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव धाडला आहे.
चालू खरीप हंगामासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. मान्सूनच्या सुरुवातीच्या अनुकूल अंदाजाने शेतकऱ्यांनी उत्साहात तब्बल ६ लाख ५१ हजार २८७ हेक्टरवर (१०१.६८ टक्के) विक्रमी पेरण्या पूर्ण केल्या. बी-बियाणे, खते आणि मशाганаतीवर हजारो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांनी पीक जगवण्याची धडपड केली. मात्र, ऐन फुलोऱ्यात आणि वाढीच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण गणितच कोलमडले.
डोळ्यांसमोर हिरवी पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च पाण्यात गेला आहे. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे केलेल्या पाहणीत कोरडवाहू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका कोरडवाहू पिकांना बसला असून, तब्बल ५ लाख ४३ हजार ५४९ हेक्टरवरील पिके जळून गेली आहेत. पाण्याची टंचाई आणि भूजल पातळी खालावल्याने ५४ हजार ६८७ हेक्टर बागायती क्षेत्र बाधित झाले आहे.
४६ हजार ५३ हेक्टरवरील द्राक्ष, डािळब व इतर फळबागांना मोठा फटका बसला असून, पुढील हंगामावरही याचे दीर्घकालीन सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाने सोमवारी (दि. २६) नुकसानीचा अंतिम अहवाल राज्य सरकारकडे केला आहे. प्रशासनाने ६५८.६० कोटी रुपयांची मागणी नोंदवली असली, तरी ही मदत लालफितीनेत न अडकता तातडीने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दुष्काळामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने आता रब्बीच्या आशाही धुसर बनल्या असून, बळीराजा शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.
कोरडवाहू: बाधित क्षेत्र - ५,४३,५४९ | बाधित शेतकरी - ५,५७,७०१ | अपेक्षित रक्कम (लाखांत) - ४६२०१.६५
बागायत: बाधित क्षेत्र - ५४,६८७ | बाधित शेतकरी - ७१,९४४ | अपेक्षित रक्कम (लाखांत) - ९२९६.७५
बहुवार्षिक फळपिके: बाधित क्षेत्र - ४६,०५३ | बाधित शेतकरी - ५७,४२० | अपेक्षित रक्कम (लाखांत) - १०३६१.९६
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने मदत व पुनर्वसन विभागामार्फत जिल्ह्यात दोन टप्प्यांत दुष्काळ निवारण यंत्रणा सक्रिय केली. पहिल्या टप्प्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या १० तालुक्यांमध्ये 'ट्रिगर-१' लागू करण्यात आला, तर दुसऱ्या टप्प्यात निफाड, त्र्यंबकेश्वर आणि चांदवड या तीन तालुक्यांमध्ये 'ट्रिगर-२' ची घोषणा करण्यात आली. यांअंतर्गत दुष्काळग्रस्त भागांत १२ प्रकारच्या विविध उपाययोजना राबवत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.