नाशिक : भारत जोडो यात्रेदरम्यान घेण्यात आलेल्या जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये दाखल घटल्याच्या सुनावणीसाठी त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. शनिवारी (दि. १) झालेल्या सुनावणीवेळी गांधी गैरहजर असल्याने, दि. ७ मे रोजी पुढील सुनावणी ठेवत हजर राहण्याबाबत न्यायालयाने सक्त आदेश दिले आहेत.
हिंगोली येथे झालेल्या तत्कालीन जाहीर सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून २०२२ मध्ये निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर नाशिक न्यायालयात सुनावणी सुरू असून, ऑक्टोबर २०२४ पासून गांधी यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे वेळोवेळी समन्स बजाविण्यात आले आहेत. त्यानुसार १ मार्च रोजीदेखील गांधी यांनी न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते. परंतु, गांधी गैरहजर राहिले व त्याबाबत गांधी यांच्या वकिलांनी अर्ज दाखल केला नव्हता. मात्र, पुढे कायमस्वरूपी हजेरीसाठी उपस्थित न राहण्यासंदर्भात त्यांनी अर्ज दाखल केल्याचे कळते. त्यावर भुतडा यांचे वकील मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद केल्यामुळे न्यायालयाने राहुल गांधी यांना दि. ७ मे रोजी नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे सक्त आदेश दिले आहेत. दरम्यान, यापूर्वीच न्यायालयात सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांविषयीचे सबळ दाखले सादर झाले आहेत. त्याआधारे न्यायालयाने या दाव्यात तथ्य असल्याचे मान्य करीत दावा दाखल करून घेतला आहे.
दरम्यान, याच स्वरूपाचा खटला पुणे न्यायालयातही सुरू आहे. त्यावर १९ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांना पुणे न्यायालयात प्रत्येक तारखेस उपस्थित रहाण्याची गरज नाही, अशा स्वरूपाचा आदेश अटी-शर्तींच्या अधीन पुणे न्यायालयाने दिला आहे. कारण, राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून, त्यांच्या झेड प्लस सुरक्षेवर होणारा प्रचंड खर्च तसेच पुणे जिल्हा न्यायालयात यापूर्वी घडलेले खुनाचे गुन्हे व बॉम्बस्फोटाच्या धमक्यांमुळे निर्माण झालेला कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न आदी कारणे देत राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी पुणे न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार नाशिकमध्येही युक्तिवाद झाला असला, तरी राहुल गांधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्यावर न्यायालयाने ठाम मत नोंदविल्याचे कळते.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सावरकरांबाबतच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर टीकाही केली होती. याप्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात सावरकरप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी (दि. १) झालेल्या सुनावणीवेळी राहुल गांधी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, ते त्यांच्या वकिलांमार्फत हजर राहिले. त्यामुळे आता यापुढील सुनावणीवेळी गांधींना ऑनलाइन हजर न राहता, प्रत्यक्ष न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे.ॲड. मनोज पिंगळे, याचिकाकर्त्यांचे वकील