Road Issue Pudhari
नाशिक

Nashik News | विनामोबदला रस्ता रुंदीकरणाला दिंडोरीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; काम न थांबल्यास न्यायालयीन लढाईचा इशारा

रामशेज, गवळवाडी आणि मानोरी परिसरातून जाणाऱ्या नवीन रस्ता रुंदीकरणाच्या कामावरून प्रशासन आणि स्थानिक शेतकरी यांच्यात संघर्ष

पुढारी वृत्तसेवा

Dindori Taluka road widening dispute

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील रामशेज, गवळवाडी आणि मानोरी परिसरातून जाणाऱ्या नवीन रस्ता रुंदीकरणाच्या कामावरून प्रशासन आणि स्थानिक शेतकरी यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. रितसर भूसंपादन न करता आणि कोणताही मोबदला न देता खाजगी मालकीच्या जमिनीतून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केल्याचा आरोप करत स्थानिक शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मदन एकनाथ लोखंडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (उत्तर विभाग, नाशिक) कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन काम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे गवळवाडी ते मौजे ढकांबे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. मात्र, ज्या जमिनीतून हा रस्ता जात आहे, त्या जमिनीवर आपला पूर्ण कायदेशीर हक्क असल्याचा दावा अर्जदार मदन लोखंडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ही जागा रितसर खरेदीखत करून, आवश्यक मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरून शासनाच्या नियमानुसार ताब्यात घेतली असल्याचे पुराव्यासह निवेदनात नमूद केले आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, शासनाने या जमिनीचे अद्याप कोणतेही कायदेशीर भूसंपादन (Acquisition) केलेले नाही. इतकेच नव्हे तर, काम सुरू करण्यापूर्वी जमिनीच्या मूळ मालकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नाही. महसूल अभिलेख किंवा गाव नकाशात या रस्त्याची कोणतीही अधिकृत नोंद नसताना हे काम अनधिकृतपणे सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. खाजगी मालकीच्या जागेत मालकांची कोणतीही संमती नसताना आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता सुरू असलेले हे काम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीचे नुकसान होत असून, या जमिनीचा कोणताही मोबदला किंवा भरपाई अद्याप मिळालेली नाही. "जोपर्यंत बाजारभावाप्रमाणे जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत हे काम तातडीने थांबवावे. प्रशासनाने बळजबरीने काम सुरू ठेवल्यास आम्हाला नाईलाजाने न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी लागेल आणि तीव्र आंदोलन छेडावे लागेल," असा इशारा मदन लोखंडे व ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण दिंडोरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT