जानोरी : समाधान पाटील
मागील वर्षी जिल्ह्यात फटका अतिपाऊस आणि वातावरणाचा बसल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात सुमारे द्राक्ष उत्पादनात ६० टक्के घट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे द्राक्ष दरात वाढ जाणवत असली, तरी उत्पादनातील घटीमुळे द्राक्ष उत्पादकांचा आर्थिक ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे.
सलग सहा ते सात महिने पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. यातून नगदी पीक द्राक्षही सुटले नाही. दिंडोरी तालुक्यात सुमारे ६० टक्के द्राक्षबागांची हानी अस्मानी संकटामुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दिंडोरीतील विविध जातींच्या दर्जेदार व रसाळ द्राक्षांना देशातील विविध राज्यांबरोबर परदेशातही मोठी मागणी असते. कोल्ड स्टोअरेजमध्ये द्राक्षे साठविण्याकडे व्यापारी चालढकल करत आहेत. भविष्यात अजून मागणी वाढते की, कमी होते असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, असे असले तरी द्राक्षांना समाधानकारक दर मिळण्याचा उत्पादकांचा अंदाज आहे.
दरम्यान, यावर्षी अपेक्षित उत्पादन अवकाळीमुळे झाले नाही. खते, महागडी औषधे, विद्राव्य खते, नैसर्गिक साधनांचा वापर याचा मोठा आर्थिक बोजा उत्पादकांवर पडला. एवढे करूनही द्राक्ष उत्पादनात अनपेक्षित मोठी घट आली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर झाला आहे.
सद्यस्थितीत द्राक्षांना देशासह परदेशात मागणी असून, दरही जास्त मिळत असला, तरी खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसविण्याचे आव्हान उत्पादकांपुढे आहे. सुधाकर, थॉमसन, अल्सेशिएन, सोनाका, जम्बो काळी, आरा, पर्पल लालसर या जातीचे उत्पादन घेतले गेले आहे. ज्यांच्या द्राक्षबागेच्या खरड छाटणी १० मार्चपूर्वी झालेल्या आहेत त्यांचे नुकसान तुलनात्मक कमी आहेत, मात्र त्यानंतर छाटणी केलेल्यांची मोठी आर्थिक हानी झाली नाही.
यात द्राक्ष घड तयार झाले नाही. १९८० पासून द्राक्ष उत्पादन घेणारे प्रकाश कड यांनी मोठी आर्थिक हानी झाल्याची माहिती दिली. सुमारे १० टक्के द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. स्थानिक पातळीवर ८० ते १०० रुपये किलो, निर्यातीला १५० ते २१० रुपये दर मिळत आहे.
दर जास्त मिळत असूनही अतोनात नुकसानीमुळे आर्थिक गणित बिघडले आहे. उत्पादकांकडून द्राक्ष खरेदीनंतर ३० ते ६० दिवसांच्या कालावधीत खरेदीदारांकडून पेमेंट अदा करण्यात येते. काही वेळा कालावधी जास्तही होतो. मात्र, उत्पादकांना पर्याय नसल्याने नाइलाजाने व्यवहार करत पैसेवसुलीसाठी मिनतवारी करावी लागते, अशी माहिती उत्पादक विलास कड यांनी दिली.
या वर्षी दरवर्षपिक्षा द्राक्ष उत्पादन कमी निघाल्यामुळे चांगला भाव आहे. उत्पादन कमी असल्यामुळे ६ ते ८ दिवस चालणारी बाग २ ते ३ दिवसांत खाली होत आहे. शेतकऱ्यांचे व व्यापारीवर्गाचे अंदाज चुकत आहे.विकासकुमार सिंह, द्राक्ष व्यापारी