दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीपात्रात एका युवकाने उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. अभोणा येथील योगेश जगन्नाथ सूर्यवंशी (३५) हा मागील काही वर्षांपासून मानसिक आजारी होता.
गुरुवारी (दि. १३) त्याची पत्नी व चुलतभाऊ त्याला अभोणा येथून खासगी वाहनाने नाशिक येथे वाहनाने उपचारासाठी घेऊन जात होते. दुपारी सव्वाबारा वाजता वाहन अवनखेड शिवारात कादवा नदीच्या पुलावर वाहन आले असता त्याने मला नदीत पैसे अर्पण करायचे आहे, असे सांगून वाहन थांबविले. त्यानंतर वाहनाचा दरवाजा उघडून पळत जाऊन पुलावरून नदीपात्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळतात पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, हवालदार कमलेश देशमुख, प्रदीप शिंदे, अविनाश आहेर यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. दुपारी सव्वातीनला त्याचा मृतदेह मिळून आला. याबाबत त्याचे चुलते प्रभाकर सूर्यवंशी यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.