नाशिक

नाशिक : देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा ; उबाठा गटाची मागणी

गणेश सोनवणे

देवळा(जि. नाशिक) : तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई असतांना शासनाने देवळा तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळला आहे. याचा देवळा तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने निषेध व्यक्त करून तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि. २) तहसीलदार विजय सूर्यवंशी, सपोनि दीपक पाटील यांना दिले.

निवेदनाचा आशय असा की, यावर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्य वृष्टी झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. त्यात नदी नाले, छोटे मोठे पाझर तलाव कोरडे ठाक पडली आहेत. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात काही गावांत भर पावसाळ्यात देखील टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. आता यात आणखी भर पडली असून, प्रशासनाकडे टँकरची मागणी सुरु झाली आहे. असे असतांना राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जिल्हातील मालेगांव, येवला व सिन्नर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. मात्र देवळा तालुक्यात या तालुक्यांपेक्षाही भयावह परिस्थिती असून, तालूक्यातील बहुतांश गावात दिवसाआड तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून, पशुपालक मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत चारा विकत घेत आहेत. असे असतांना राज्य शासनाने देवळा तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळला. यामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र नाराजीचा सूर उमटला असून, प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन देवळा तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करावा, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, उप तालुका प्रमुख विलास शिंदे, तालुका संघटक प्रशांत शेवाळे, उपतालुका संघटक विजय आहेर, उप शहरप्रमुख सोमनाथ शिंदे, गणप्रमुख सुनील शिंदे, जितेंद्र भामरे, विभाग प्रमुख गोरख गांगुर्डे, खडूं जाधव, सुनील शिंदे, किरण जाधव, भूषण गोराणे, बाबाजी माळी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT