देवळा ; उमरणा येथे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करतांना पालकमंत्री दादा भुसे, आमदार डॉ राहुल आहेर आदी.  (छाया: सोमनाथ जगताप)
नाशिक

नाशिक : देवळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान

कोलथी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ; शेतपिकांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

देवळा : देवळा तालुक्यात शनिवारी (दि.१९) सायंकाळी विजांच्या कडकडासह वादळी वारा व ढगफुटी सदृश्य झालेल्या जोरदार पावसाने पश्चिम भागातील कोलथी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी शेतात पाणी शिरल्याने लागवडी खालील कांदा, मका, द्राक्ष, डाळींब आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे खर्डे परिसरात रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. रविवारी (दि.20) दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. उमराणे येथे शनिवारी (दि.१९) सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे ,आमदार डॉ राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.

देवळा / वाखारी - चिंचबारी घाटातील मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला रस्ता

शनिवारी (दि.१९) सायंकाळी ७.३० ते ८.३०च्या दरम्यान विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग चिंतित झाला असून अनेक भागात शेताचे बांध तोडून पाणी वाहून गेल्याने कांदा बियाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे विजांचा प्रचंड कडकडाट झाल्याने जनावरांना सांभाळणे कठीण झाले होते. देवळा तालुक्यातील कापशी, भावडे, वाखारी येथे डोंगर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाझर तलाव भरून शेतांमधून पाणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाखारी - चिंचबारी परिसारत झालेल्या पावसामुळे चिंचबारी घाटातील रस्ता वाहून गेला.

देवळा / वाखारी येथे मका शेतात मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी

मेशी, दहिवड, रणदेवपाडा, देवपूरपाडा, महालपाटणे, निंबोळा ,खामखेडा विठेवाडी, खर्डा, परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. याठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने फरशी पुलांवरून पाणी वाहत आहे. तर गल्लोगल्लीचे रस्ते वाहून गेले आहेत.

देवेंद्र निकम ( वाखारी) यांच्या मका शेतात पाणी शिरल्याने सरसकट पंचनामा करण्यात यावा अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे (उळे) पोळ कांदा, मका, सोयाबीन आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. उमराणे व चिचवे येथे झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला. नदीकाठच्या घरात पाणी शिरले आहे. घटनास्थळी पालकमंत्री दादाजी भुसे व आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

यंत्रणेला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असून मांजरवाडी परिसरात कांदा पिकासह इतर पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी नुकसानग्रस्त भागाची केदा आहेर यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला. प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT