देवळा : सावकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारतीचे प्लास्टर रविवारी (दि. २६) अचानक कोसळल्याची घटना घडली. रविवार असल्याने आरोग्य केंद्राला सुट्टी होती. त्यामुळे त्या वेळी परिसरात रुग्ण किंवा कर्मचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे जीर्ण झालेल्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सुमारे ३३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही इमारत सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. छत आणि भिंतींचे प्लास्टर वारंवार कोसळत असल्याने रुग्ण, आरोग्य कर्मचारी तसेच मुक्कामी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा सुरू असल्याने भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी घडलेल्या प्रकारानंतर प्रशासनाने तातडीने जीर्ण इमारतीची पाहणी करून नवीन इमारतीस मंजुरी द्यावी आणि लवकरात लवकर बांधकाम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी मेघा वाबळे आणि सहायक गटविकास अधिकारी बाबा सूर्यवंशी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी सरपंच उषा सोनवणे, उपसरपंच हेमंत पवार, ग्रामपंचायत अधिकारी व्ही. जी. भामरे, शेखर बोरसे, धनंजय बोरसे, उमेश सोनवणे, संजय भामरे, आरोग्य सेवक महेश पाटील, आरोग्य सेविका दीपिका बच्छाव आदी उपस्थित होते.
सावकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी भिंतींचे प्लास्टर गळत असून छत आणि इमारतीतील तडे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी शासनाने तातडीने उपाययोजना करून नवीन इमारतीस मंजुरी द्यावी,- धनंजय बोरसे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी