देवळा ( नाशिक) : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी धनश्री केदा आहेर व उपसभापतीपदी विजय जिभाऊ सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते सभापती योगेश आहेर आणि उपसभापती शिवाजी अहिरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी आज, शुक्रवारी (दि. 12) दुपारी चार वाजता सहाय्यक निबंधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली.
निर्धारित वेळेत सभापतीपदासाठी धनश्री आहेर आणि उपसभापतीपदासाठी विजय सोनवणे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दोघांची अविरोध निवड घोषित केली.
नवीन सभापती धनश्री आहेर यांच्या उमेदवारीसाठी सूचक म्हणून योगेश आहेर आणि अनुमोदक म्हणून दिलीप पाटील यांनी स्वाक्षरी केली. उपसभापती विजय सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी सूचक म्हणून रेश्मा महाजन आणि अनुमोदक म्हणून अभिमन पवार यांनी स्वाक्षरी केली.
या बैठकीस संचालक शिवाजी पवार, अभिजित निकम, विशाखा पवार, दीपक बच्छाव, शाहू शिरसाठ, निंबा धामणे, शितल गुंजाळ, संजय शिंदे, भास्कर माळी, भाऊराव नवले, सचिव माणिक निकम, तसेच मविप्रचे संचालक विजय पगार, माजी सभापती केदा आहेर, बापू देवरे, अतूल पवार, संजय आहेर, अनिल आहेर, शिवाजी आहिरे, भारत कोठावदे, डॉ. प्रशांत निकम, योगेश वाघमारे, राजेंद्र वडनेरे, बाळासाहेब आहेर, हर्षद भामरे, रमेश अहिरे, छबु भामरे, अशोक अलई, काशिनाथ धामणे, योगेश गुंजाळ, सुरेश जाधव, बापू जाधव यांसह अनेक हितचिंतक उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड घोषित होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
दरम्यान, निवडणुकीच्या वेळी संचालक भाऊसाहेब पगार अनुपस्थित होते. ते आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत खर्डे गटातून इच्छुक उमेदवार असल्याची चर्चा होती, तसेच त्यांची सभापतीपदी निवड होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.