मेशी (मालेगाव) : गाव व परिसरात पावसाने शनिवारी (दि. 20) वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यामुळे घराजवळ लिंबाच्या झाडाजवळ आश्रयाला उभ्या असलेल्या शेतकर्याचा मृत्यू वीज पडून झाला. दुपारी 3 च्या सुमारास वर्हाळे येथे हा प्रकार घडला.
या अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव केदा यादव खैरनार (51) असे आहे. देवळा तालुक्यातील वर्हाळे येथील शेतकरी केदा यादव खैरनार हे शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस आल्याने ते घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली आश्रयास थांबले होते. त्याच वेळी या लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. त्याचा झटका केदा खैरनार यांना बसला. वीज पडल्याने लिंबाच्या झाडाचा काही भागदेखील जळून खाक झाला. स्थानिक नागरिकांनी मालेगाव येथे शासकीय रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून खैरनार यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृत केदा खैरनार यांच्यावर रात्री 8.30 च्या सुमारास शोकाकुल वातावरणात अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. अचानक झालेल्या नैसर्गिक आपत्तीत घरातील कर्ता पुरुष मृत पावल्याने कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.