देवळा (खडकतळे, जि. नाशिक) – दोन दिवसांपासून हरवलेली पल्लवी समाधान पगार (वय 14) हिचा मृतदेह शनिवारी (दि. 9) दुपारी 1 वाजता घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खडकतळे (ता. देवळा) येथील पल्लवी गुरुवारी (दि. 7 ऑगस्ट) कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला, तसेच देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी (दि.9) दुपारी घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पल्लवीच्या जीवन संपण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करत असून गावात या घटनेने शोककळा पसरली आहे तर पगार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.