नाशिक : पावसाळा सरल्यानंतर थंडीचा जोर वाढताच शहरात डेंग्यूचा ज्वरही ओसरला आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव घटल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे १०७ रुग्ण आढळले होते. गेल्या तीन आठवड्यात ६८ नवे रुग्ण आढळले असून रुग्णसंख्येचा आकडा कमी होत आहे. दरम्यान जानेवारी पासून आतापर्यंत डेंग्यूबाधितांचा आकडा मात्र ११४७ पर्यंत पोहचला आहे.
नाशकात पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासूनच डेंग्यूची लागण सुरू झाली होती. मे महिन्यात या आजाराचे तब्बल ३३ नवे रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यूचे १६३ नवे रुग्ण आढळले तर जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराचे विक्रमी ३०७ रुग्ण आढळले होते. पावसाच्या पाण्याची ठिकठिकाणी साचलेली डबकी या आजाराच्या उद्रेकास कारणीभूत ठरली. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे १९८ नवे रुग्ण आढळले. तर सप्टेंबरमध्येही या आजाराची लागण झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा १९८ इतकाच होता. पावसाने ओढ दिल्यानंतर डेंग्यूबाधितांचा आकडा कमी होण्यास सुरूवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा हा १०७ पर्यंत खाली आला होता. तर नोव्हेंबरच्या तीन आठवड्यात हा आकडा आता ६८ वर आला आहे. त्यामुळे जानेवारी पासून आतापर्यंत ११ महिन्यात शहरातील डेंग्यूबाधितांचा आकडा हा ११४७ पर्यंत पोहचला आहे. शहरातील डेग्यूबाधितांचा आकडा कमी होत असल्याचा दावा पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे.