नाशिक : नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून, रुग्णसंख्येचा आकडा आता शंभरीपार गेला आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक ४५ रुग्ण आढळले होते. नऊ जणांना चिकुनगुनिया, तर १२ जणांना मलेरियाची लागण झाली आहे. डेंग्यू निर्मूलनासाठी मनपाच्या वैद्यकीय पथकांमार्फत डेंग्यू जनजागरण मोहीम राबवण्यात येत असून, घरभेटींद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे.
पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. रिकामे प्लॉट, बांधकामस्थळे, बेसमेंट, स्क्रॅप डेपो, टायर दुकाने तसेच छतावरील पाण्याच्या टाक्यांत पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. यंदा जूनपर्यंत डेंग्यूची स्थिती नियंत्रणात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३ आणि जूनमध्ये ८ रुग्ण आढळले होते
मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये सर्वाधिक ४५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे डेंग्यूची रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेऊन मलेरिया विभागाने घराघरांत तपासणी, अळी शोध मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विविध शासकीय कार्यालये तसेच बांधकामस्थळांवर तपासणीदरम्यान डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे.
जुलैमध्ये १२०, ऑगस्टमध्ये आतापर्यंत आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात सामनगाव येथील ८८ शासकीय तंत्रनिकेतन, जिल्हा परिषद जुनी इमारत जिल्हा परिषद नवीन इमारत, नाशिकरोड रेल्वेस्थानक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सांख्यिकी कार्यालयासह शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या आस्थापनांचा समावेश आहे.
सिडकोत १३ रुग्ण
शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता ऑगस्टमध्ये आढळलेल्या ४५ रुग्णांपैकी सर्वाधिक १३ रुग्ण हे एकट्या सिडकोतील आहेत. खालोखाल नाशिक पूर्व विभागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. पंचवटीत ७, नाशिक पश्चिम ७ तर, सातपूरमध्ये ६ रुग्ण आढळले आहेत.