सलग चार दिवस सुट्यांमुळे गणेशोत्सवाला बहर आला असून देखावे बघण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी दिसून येत आहे.  (छाया : हेमंत घाेरपडे)
नाशिक

नाशिक : भर पावसात गणेशभक्तांचा महापूर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सलग चार दिवस सुट्यांमुळे गणेशोत्सवाला बहर आला असून, शनिवारी (दि. 14) गणेशमंडळांनी सादर केलेले देखावे बघण्यासाठी भर पावसातही गणेशभक्तांची गर्दी लोटली. वीकएन्डमुळे शनिवार, रविवारची सुटी, सोमवारी (दि. 16) ईदची सुटी तर मंगळवारी (दि. 17) गणेश विसर्जन असल्याने गणेशोत्सवाला शेवटचे चार दिवस उरले आहेत. देखावे पाहण्यासाठी सोबत आणलेल्या छत्र्यांचा आसरा घेत सहकुटूंब सहपरिवार गणेशभक्तांनी गणेश देखावे पाहण्यास गर्दी केली.

शहरातील बी. डी. भालेकर मैदान, शालिमार, भद्रकाली परिसर, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, मुंबई नाका, नाशिक रोड, सिडको आदी भागात पारंपरिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेश देखावे सादर करण्यात येतात. वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक, महिला अत्याचार, प्रदूषण, पर्यावरण संरक्षण आदी विषयांवर प्रबोधनात्मक देखाव्यांद्वारे जनजागृती करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेवटचे चार दिवस हजारोंच्या संख्येने नाशिककर हे देखावे बघण्यासाठी बाहेर पडत आहेत. बालगोपाळ कुटूंबासह देखावे बघण्यास येत असल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. यामुळे संपूर्ण शहर गणेशमय झाल्याचा भास होत आहे. पौराणिक, धार्मिक देखावे, सामाजिक प्रश्न, व्यसनाधिनता, महिला अत्याचार, विद्युत रोषणाई, सुरेख मंडप डेकोरेशन बघतांना गणेशभक्तांचे डोळे दिपून जात आहेत.

देखावे बघण्यासाठी शेवटचे दोन दिवस

गणेशोत्सवाचा रविवारी (दि. १५) नववा दिवस असून, सोमवारी दहावा तर मंगळवारी गणेश विसर्जन आहे. शनिवारी पावसाने उसंत घेतल्याने देखावे बघण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रविवारी पावसाने उघडीप दिल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले आहे.

देखाव्यासमोर गर्दी करु नये

गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरल्याने देखावे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी एकाच ठिकाणी जास्त गर्दी करु नये. गर्दीच्या ठिकाणी थांबू नये, लहान मुले, सोन्याचांदीचे दागिने सांभाळावे, संशयित फिरतांना आढळल्या पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT