नाशिक : ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स’ नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीतील चुकीचे नियोजन आणि चुकीच्या अंदाजामुळे इंडिगो एअरलाइन्सची देशभरातील सेवा कोलमडली. कित्येक फ्लाइट रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. नाशिकमधील सेवा देखील प्रभावित झाली. नाशिक-दिल्ली रात्रीची फ्लाइट रद्द करावी लागली. अन्य फ्लाइट देखील विलंबाने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, सेवा पूर्ववत करण्यासाठी इंडिगो व्यवस्थापनाने दोन दिवस तिकिट बुकिंग बंदचा निर्णय घेतला. यामुळे नाशिक-दिल्ली विमानाचे तिकिट २७ हजारांवर पोहाेचले.
ओझर विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्स कंपनीकडून सहा शहरांसाठी सेवा सुरू आहे. नाशिक-दिल्ली विमानसेवेची मागणी लक्षात घेता दोन फ्लाइट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय हैदराबाद, अहमदाबाद, गोवा, बंगळुरू या शहरांना जोडणारीही सेवा सुरू आहे. दरम्यान, ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स’ नियमांमुळे इंडिगो व्यवस्थापनाकडे मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला. त्याचा परिणाम एअरलाइन्सच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवांवर झाला. व्यवस्थापनाकडून सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी, कोलमडलेल्या सेवेमुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेता, इंडिगोने शनिवार (दि.६) आणि रविवार (दि.७) विमान तिकिट बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. या दोन दिवसात ज्या प्रवाशांनी बुकिंग केले, त्यांनाच सेवा देण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यामुळे नाशिकहून प्रवास करू इच्छिणाऱ्यांना दोन दिवसानंतरच नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय दोन दिवस बुकिंग बंद असल्याने, ८ ऑगस्टपासूनचे विमानाचे तिकिट सरासरीपेक्षा तिप्पटीने दर्शवले जात आहेत. त्यामुळे विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.
एअरलाइन्सने सेवा पूर्ववत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याबरोबरच दोन दिवस बुकिंग बंद ठेवली आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसानंतर सेवा पूर्ववत होतील, अशी अपेक्षा आहे.मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा, नाशिक.