नाशिक : स्पर्धात्मक युगानंतर सीएस अर्थात कंपनी सचिव या महत्त्वपूर्ण पदाच्या परीक्षांमध्ये सकारात्मक बदल होत असून, येत्या काळात अभ्यासक्रमातही बदल करण्यात येणार आहेत.
विद्यार्थीसंख्या वाढावी यासाठी पदवीनंतर घेतल्या जाणाऱ्या एक्झिक्युटिव्ह परीक्षेत देण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी किमान गुणांची मर्यादा रद्द करण्यात आली असून, आता कोणत्याही विषयाची पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षा देऊ शकेल, अशी माहिती कंपनी सचिव संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी (दि. ११) नाशिक येथे माध्यमांशी बोलताना शुक्ला म्हणाले, केंद्र सरकारने कायद्यांमध्ये केलेल्या सकारात्मक बदलानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. देशभरात न्यायालयांमध्ये अडकलेल्या खटल्यांची संख्या पाहता, औद्योगिक क्षेत्रातील वाढते खटले त्वरित मिटविले जावेत, यासाठी कंपनी सचिवांना काही अधिकार प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन केले असून, लवाद आणि कन्सिलिएशन या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील वाद बाहेरच मिटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याप्रसंगी उपाध्यक्ष पवन चांडक, नाशिक चॅप्टर अध्यक्ष वैशाली भट, ऋषिकेश वाघ, आशिष कोरडिया, कीर्ती डिडवाना, सागर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
२०२७ मध्ये नवीन अभ्यासक्रमासाठी आतापासूनच तयारी केली जात असल्याचे उपाध्यक्ष पवन चांडक यांनी सांगितले. याशिवाय विविध उपक्रमांमधून कंपनी सेक्रेटरी ही संस्था सामाजिक दायित्व राबवित असून, वीरमृत्यू प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाप्रती सद्भावना राखते. त्यासाठी काही उपक्रम सुरू असल्याचे धनंजय शुक्ला म्हणाले.