Nashik  Death of leopard and peacock due to electric shock
विजेचा शॉक लागून बिबट्या आणि मोराचा मृत्यू pudhari bhoto
नाशिक

Nashik | विजेचा शॉक लागून बिबट्या आणि मोराचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : येथील घागरनाला ओहळमधील पानसरे वस्तीवरील विद्युत रोहित्राच्या विजेचा धक्का लागून राष्ट्रीय पक्षी मोर व बिबट्याचा मृत्यू रविवारी (दि. २१) झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. मागील महिन्यात बिबट्याने गाय, वासरू व कुत्री फस्त केली. रविवारी पहाटे बिबट्याने मोराची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र, मोराने बचावासाठी जवळील विद्युत रोहित्राचा आधार घेतला. त्यानंतर बिबट्याही विद्युत रोहित्रावर चढला. मात्र, त्याची शेपटी रोहित्रावरील तारेला लागल्यामुळे विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेत मोराचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या बिबट्याचे वय हे सुमारे नऊ वर्षे असून, तो नर जातीचा आहे.

घटनेची माहिती वन्यजीवरक्षक राजेंद्र पवार, स्वप्निल देवरे यांना समजताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी नाना देवरे, विजय टेकनार, अजय शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत मोर व बिबट्या यांना ताब्यात घेतले. त्यानंतर चांदवड परिक्षेत्र येथे त्यांच्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

SCROLL FOR NEXT