पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून अमृतधामकडे जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला सुजल वाळवंटे (२०) हा युवक थेट डाव्या कॅनॉलच्या पाटात पडून वाहून गेल्याची घटना शनिवारी (दि.१३) रात्री पावणे आठ वाजता घडली होती. पाटाला आवर्तन सोडल्याने त्यास चांगल्या प्रमाणात पाणी होते. पोलीस आणि अग्निशामक दलाने त्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तो सापडत नव्हता. रविवारी (दि.१४) रोजी त्याचा मृतदेह म्हसोबा मंदिराजवळ सापडला असून त्याचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलगिरी बाग वसाहतीत राहणारा सुजल मुंबई येथे नोकरीस होता. तर तो आई वडिलांना भेटण्यासाठी नाशिकला आला होता. शनिवारी (दि १३) रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास तो त्याचा मित्र पुणेश सोमनाथ मुळे (१९) याच्यासोबत दुचाकीने (एम एच४६ बी एम ६४०) निलगिरी बागेजवळच्या डाव्या कालव्यावरून अमृत धामकडे जात होता. त्यावेळी अचानकपणे दुचाकी घसरून दोघे पडले. यात पुणेश रस्त्यावर पडला तर सुजल हा कालव्यात पडला आणि पाटाच्या पाण्यात वाहून गेला. ही बाब काही सुज्ञ नागरिकांनी बघितली व तातडीने घटनेची माहिती पोलिस व अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेत कालव्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत सुजलचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान रविवारी दुपारी सुजल ज्या ठिकाणी पाण्यात पडलेला होता त्याच ठिकाणी कपारीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मित्र पुणेश हा देखील जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.