नाशिक : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गतवर्षी मृत्यू झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालात मात्र सदर रुग्णाचा कुठेही संबंध जोडला नाही.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या हजार पानांच्या अहवालावर एका ओळीत एका दिवसाचे वेतन बंद करण्यात यावे, असे आदेश दिले. या आदेशावर ग्रामस्थ संतप्त झाले आहे. त्यांनी आरोग्य विभागाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १९ ऑगस्ट २०२४ रोजी वणी ग्रामीण रुग्णालयात बाबापूर येथील बळवंत लालाजी राऊत यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयाला पाठवले. रुग्णवाहिकेतून सदर रुग्णाला घेवून जात असताना तळेगाव आरोग्य केंद्राजवळ त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने रुग्णवाहिकेच्या वाहकाने अत्यावश्यक म्हणून आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, तेथे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण मृत पावल्याची घटना घडली. या घटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दखल घेत या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे व डॉ. राजेंद्र बागुल यांची चौकशी करून अहवाल सादर केला. चौकशी समितीने कर्तव्यावर उपस्थित नसणे, विना परवानगी मुख्यालय सोडणे, प्रा.आ. केंद्रात कर्मचारी यांचे कामाचे योग्य व्यवस्थापन न करणे, ग्रामीण जनतेस आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणे या बाबींकरीता दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर योग्य प्रशासकीय कार्यवाही करण्याचा अहवाल सादर केला. मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना या गंभीर आरोपाबद्दल फक्त एका दिवसाचे वेतन बंद करण्यात यावे असा आदेश दिले.