नाशिक : पॉस मशीन अपडेट करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या असताना रेशन दुकानदारांनी पॉज मशीन अपडेशन सुरू केल्यास मशीनमधील रेशन कार्डधारकांचा डाटा डिलीट होत असल्यामुळे दुकानदारांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आता ग्राहकांचे केवायसी पुन्हा करावे लागणार की काय, अशी भीती रेशन दुकानदारांना भेडसावत आहे.
धान्य वितरणातील गैरकारभार बाहेर येत असताना, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी ई- केवायसी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. ज्यांचे केवायसी होणार नाही त्यांना धान्य दिले जाणार नाही, असे सांगण्यात आल्याने केवायसी प्रक्रियेने वेग घेतला आहे. मात्र, त्यानंतरही तब्बल 20 टक्के केवायसी बाकी असल्याने 30 जूनची मुदतवाढ देण्यात आली. अशातच पॉज मशीनला नवीन व्हर्जन डाउनलोड करण्याची सूचना आल्यानंतर ते अपडेट केल्याने अनेकांच्या मशीनमधून डाटाच गायब झाला आहे. त्यामुळे झालेल्या केवायसीचे काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. दुकानदारांनी गरीब, आजारी, वयस्कर, दिव्यांग व अशी बरीच कारणे असलेल्या कार्डधारकांच्या घरी जाऊन, दवाखान्यात जाऊन केवायसी पूर्ण केली होती. पण, आता पुन्हा जर कार्डधारकांना तुमची केवायसी नाही झाली परत करावी लागेल असे सांगितले, तर सगळीकडे दुकानदार आणि कार्डधारकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे वैतागलेल्या दुकानदारांनी सरकारने आता स्वतःच लोकांच्या घरी जाऊन केवायसी करून घ्यावी किंवा दुसरी यंत्रणा लावावी, अशी मागणी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. दुकानदार संघटनेचे सलीम पटेल, महेश सदावर्ते, गणेश कांकरिया, उमेश वैद्य, नागेश कोथमिरे, रतन काळे, रमेश जाधव, बाजीराव मते, मंगेश पवार, दीपक चव्हाण, श्रीकांत मते, दिलीप मोरे, गौरी आहेर, पंकज कुलकर्णी आदींचा त्यात समावेश आहे.