नाशिक : जिल्ह्यातील धरण समुहात अवघा 28.36 टक्के म्हणजेच 18 हजार 624 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जलाशयातील पाणीपातळी तळ गाठत आहे.
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्या गंगापूर धरणातही दिवसेंदिवस पाणी पातळी खालावत आहे. गंगापूर धरण समुहात 33.75 टक्के म्हणजे तीन हजार 431 दलघफू जलसाठा शिल्लक आहे.
पावसाळ्यात नियोजित वेळी पाऊस नाही झाला तर पाणी टंचाईचे संकट उद्भभवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. 500 गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मे अखेरीस पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मान्सूनचे आगमन लांबल्यास तीव्र पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाणी पुरवठ्यासाठी सात कोटी 70 लाखांचा टंचाई आराखडा तयार ठेवला आहे. जिल्ह्यातील 484 गावे आणि 567 वाड्यांत पाणी टंचाई गृहीत धरत प्रशासनाने कृती आराखडा तयार केला होता.
उन्हाचा कडाका वाढत असल्याने भोजापूर धरणाने तळ गाठला आहे. पालखेड धरण समुहात 12.79 टक्के तर ओझरखेड धरण समुहात 16.37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.