नाशिक : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख 24 प्रकल्पांमध्ये आजमितीस ९९.५२ टक्के उपयुक्त जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची पुढील जूनपर्यंत पाण्याची चिंता दूर सरली आहे.
चालू वर्षी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जिल्हावासीयांवर वरुणराजाने कृपावृष्टी केली आहे. जून व जुलै महिन्यात जेमतेम हजेरी लावणाऱ्या पावसाने पुढील दोन महिन्यांत सर्व बॅकलाॅग भरून काढला. त्याचा फायदा जिल्ह्यातील धरणांना झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये सध्या ६५ हजार ३४६ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सन २०२३ मध्ये या कालावधीत हा साठा ५५ हजार ६४७ दलघफू म्हणजेच ८५ टक्के होता. दरम्यान, आजच्या घडीला तब्बल १७ धरणे काठोकाठ भरली आहेत. सहा धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिकचा जलसाठा आहे. तर गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे मागील दोन वर्षांपासून कोरडेठाक असलेले नागासाक्या धरण ६६ टक्के भरले आहे. धरणांमधील उपलब्ध साठा लक्षात घेता जिल्हावासीयांचा पुढच्या पावसाळ्यापर्यंतची पिण्याच्या पाण्यासह सिंचन व औद्योगिक क्षेत्रासाठीची पाण्याची चिंता मिटली आहे.
नाशिकमध्ये आज अखेरीस वार्षिक सरासरीच्या ९९ टक्के पर्जन्याची नोंद झाली आहे. अद्यापही परतीच्या पावसाचा काही कालावधी शिल्लक आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. एक जूनपासून ते आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वरद्वारे जायकवाडीत ५३ हजार ४८५ दलघफू म्हणजे ५४ टीएमसी पाणी पोहोचले. त्यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाल्याने मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला आहे.
समूह- साठा (दलघफू)- टक्के
गंगापूर- 10166- 100
दारणा- 18752- 99.22
पालखेड- 8326-100
ओझरखेड- 3205- 99.91
चणकापूर- 22926- 99.41
पुनद- 637- 99.82