जानोरी (नाशिक): दिंडोरी तालुक्यातील दहेगाव वागळूद येथे गेल्या अनेक दिवसापासून तलाठी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन दिले. तातडीने कायमस्वरुपी तलाठी देण्याची मागणी केली.
दहेगाव वागळूद सजा अंतर्गत येणाऱ्या गावातील महसूल कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना सातबारा उतारा, फेरफार नोंद, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सरकारी योजनांसाठी तलाठ्यांच्या स्वाक्षरीची नितांत गरज असते. मात्र, तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठीही पालकांची धावपळ होत आहे.
तलाठी नसल्यामुळे आमची महत्त्वाची कामे रखडली आहेत, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, अशी भावना उपसरपंच अजित कड, सचिन गणोरे, नवनाथ मेधने, भाऊसाहेब कड यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने त्वरित तलाठ्याची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.